बंडखोर जगदीश गुप्ता यांची भाजपमधून दुसऱ्यांदा हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 11:07 AM2024-11-07T11:07:54+5:302024-11-07T11:10:07+5:30
Amravati : रमेश बुंदिले, तुषार भारतीय, प्रमोद सिंह गडरेल यांचेही निलंबन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्वतःला अमरावती विधानसभा मतदारसंघातील भाजपचे अनधिकृत उमेदवार संबोधणाऱ्या जगदीश गुप्ता यांची खुद्द भाजपनेच पक्षातून हकालपट्टी केली आहे. यापूर्वी देखील सन २०११ मध्ये त्यांना भाजपमधून निलंबित करण्यात आले होते, हे विशेष. याशिवाय प्रदेश कार्यकारिणी सदस्य तुषार भारतीय आणि प्रमोद सिंह गडरेल यांनाही पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
प्रदेश भाजपचे कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांच्या स्वाक्षरीने ५ नोव्हेंबर रोजी ४० बंडखोरांना भाजपमधून निलंबित करण्यात आले आहे. त्यात भाजप घटक पक्ष असलेल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांचादेखील समावेश आहे. गुप्ता यांना निलंबन नवे नाही. मात्र, आताच्या ताज्या निलंबनामुळे त्यांच्या राजकीय गलबताला भलेमोठे भगदाड पडले आहे. निलंबनामुळे त्या गलबतात पाणी शिरू लागल्याने समर्थक देखील सैरावैरा झाले आहेत. विशेष म्हणजे, आपण १२ वर्षे अर्थात तब्बल एक तप कुठे होता, असा प्रश्न त्यांना मतदार विचारू लागले आहेत.
आपण जर 'पार्टी विथ डिफरंस'चे सन्माननीय सदस्य होतात आणि अमरावतीची सीट भाजपप्रणीत महायुतीतील अजित पवार गटाला सुटली आहे, हे ज्ञात असूनही आपली बंडखोरी का, असा सवाल गुप्ता यांना त्यांच्या समर्थकांतून विचारला जात आहे. सन २०१२ च्या महापालिका निवडणुकीत देखील गुप्ता यांनी भाजपशी फारकत घेऊन जनकल्याण आघाडी स्थापली होती. मात्र त्यावेळी जनकल्याण आघाडीचा केवळ एक उमेदवार निवडून आला होता. तब्बल २२ वर्षे आमदारकी भूषविणाऱ्या जगदीश गुप्तांच्या जनकल्याणचा केवळ एक नगरसेवक निवडून यावा, ही गुप्ता यांची राजकीय सही संपल्याची घंटा होती. त्यामुळे तब्बल एक तपानंतर गुप्ता यांची रि एन्ट्री त्यांच्याच समर्थकांना बुचकळ्यात पाडणारी ठरली आहे. गुप्ता यांना समर्थ करणारे भाजप पदाधिकारी रडारवर आहेत.
दर्यापुरात युवा स्वाभिमानला धक्का
दर्यापूरचे भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले हे सध्या युवा स्वाभिमान पार्टीकडून निवडणूक लढत आहेत. बुंदिले हे भाजपचे पदाधिकारी असून, त्यांनी राजीनामा न देता अन्य पक्षातून उमेदवारी दाखल केली आहे. हा प्रकार पक्षशिस्त आणि अनुशासन भंग करणारी असल्यामुळे रमेश बुंदिले यांना भाजपतून निलंबित करण्यात आल्याचे पत्र बुधवारी भाजप प्रदेश कार्यालयाचे सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी जारी केले आहे. भाजपने बुंदिले यांना बंडखोर उमेदवार ठरविल्याने युवा स्वाभिमानला झटका मानला जात आहे. रमेश बुंदिले यांच्या प्रचारात सहभागी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सुद्धा कारवाई होणार असल्याचे संकेत आहेत.