कमाईसाठी पार्सलची देवाणघेवाण!
By admin | Published: June 28, 2014 11:19 PM2014-06-28T23:19:28+5:302014-06-28T23:19:28+5:30
पैशाच्या हव्यासापाई मार्गात एसटी थांबवून पार्सलची देवाण-घेवाण करण्याचा व कमाईचा फंडा चालक-वाहकांनी शोधून काढला आहे. या प्रकारामुळे प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यास विलंब होतो.
चालक-वाहकांची मनमानी : राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष
अमरावती : पैशाच्या हव्यासापाई मार्गात एसटी थांबवून पार्सलची देवाण-घेवाण करण्याचा व कमाईचा फंडा चालक-वाहकांनी शोधून काढला आहे. या प्रकारामुळे प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यास विलंब होतो. एसटीचे चालक-वाहक राज्य परिवहन महामंडळाची दिशाभूल करीत असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्रात सर्वांच्या सोईचे प्रवासाचे साधन म्हणून एसटीचा नावलौकिक आहे. अहोरात्र प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटीमुळे प्रवाशांना कोठेही वेळेवर पोहोचता येते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील एसटी चालक व वाहकांनी अतिरिक्त कमाईचा फंडा शोधला आहे. अमरावती आगारात येणाऱ्या अन्य शहरातून बाहेर जाणाऱ्या तसेच शहरात येणाऱ्या एसटी बसचे चालक-वाहक पार्सलची देवाणघेवाण करतात.
छोट्या-मोठ्या पाकिटांमधून शहरातील अन्य शहरातील मित्रांना, नातेवाईकांना आवश्यक कागदपत्रे किंवा अन्य महत्त्वाचे साहित्य पाठवितात. अल्प खर्चात या पाकिटांची देवाणघेवाण होत असल्याने नागरिक एसटीला प्राधान्य देत आहेत. एसटीचालक व वाहकांंच्या संगनमताने पार्सलची देवाण-घेवाण केली जात आहे. ठिकाण लांबचे असो वा जवळचे अवघ्या ३० ते ५० रुपयांमध्ये पार्सलची देवाणघेवाण केली जाते.
अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या एसटीमध्ये चालकांना पार्सल देण्याचे प्रकार खुलेआम सुरू आहे. मार्गात बस थांबवून पार्सलची देवाणघेवाण होत असल्याचे प्रकारही वाढीस लागले आहे. राजकमल चौक, राजापेठ, नवाथेनगर व साईनगर या मार्गावरुन जाणाऱ्या एसटीत हा प्रकार चालतो.
पार्सल देण्यासाठी थांबलेल्या एसटीच्या मागे वाहनांची रांग लागते. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेरगावी निघालेल्या प्रवाशांनासुद्धा यामुळे ताटकळत राहावे लागते. या प्रकारामुळे प्रवासी त्रस्त झाले असून परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.