परतवाड्यात बेवारस लाकूड
By admin | Published: April 20, 2017 12:16 AM2017-04-20T00:16:57+5:302017-04-20T00:16:57+5:30
परतवाड्याच्या लाकूड बाजारात आरागिरण्यांसमोर आडजात प्रजातीचे बेवारस लाकूड पडले असताना ते वनाधिकाऱ्यांना का दिसत नाही?
वनाधिकाऱ्यांंचे दुर्लक्ष : कडुनिंब, गोंदण महारुखाचे लाकूड
अमरावती: परतवाड्याच्या लाकूड बाजारात आरागिरण्यांसमोर आडजात प्रजातीचे बेवारस लाकूड पडले असताना ते वनाधिकाऱ्यांना का दिसत नाही? असा सवाल केला जात आहे. लाकूड बेवारस असेल तर ताब्यात घेण्याची कारवाई वनविभाग का करीत नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
जिल्ह्यात सर्वात मोठी लाकडाची बाजारपेठ परतवाडा आहे. मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या परतवाड्यात आरागिरण्यांची संख्या देखील जास्त आहे. येथील आरागिरणींचा कारभार मिळविण्यासाठी वनाधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा चालते. काहीवेळा मर्जीतील वनाधिकाऱ्यांना परतवाडा खुर्ची मिळावी, यासाठी मंत्रीमहोदयाची फोन देखील वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना येत असल्याची माहिती आहे. येथे लाकूड तस्करी ही नित्याचीच बाब असली तरी अवैध वृक्ष कटाई केंव्हा थांबणार, असा सवाल सामान्यांचा आहे. गत काही महिन्यांपूर्वी परतवाडा, अचलपुरात अवैध लाकूड कटाईला लगाम लावण्यात आला होता. उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांनी आरागिरण्यांवर धाडसत्र राबवून अवैध लाकूड जप्तीची कारवाई केली होती. मात्र परतवाड्यात आरागिरण्यांच्या बाहेर बेवारस लाकूड ठेवले जात असेल तर ते ताब्यात घेण्यासाठी वनपरिक्षेत्राधिकारी का धाडस दाखवित नाही, असे बोलले जात आहे. लाकूड बाजारात रस्त्यालगत आरागिरण्यांच्या बाहेर लाकूड बेवारस ठेवणे ही बाब सर्रास सुरू आहे. अवैध कटाईचे बेवारस लाकूड कुणाचे? हे लाकूडबाजारात व्यावसायिकांना माहिती राहते. मात्र अवैध लाकूड आरागिरण्यांमध्ये ठेवल्यास व तपासणी झाल्यास ते अंगलट येऊ शकते त्यामुळे आरागिरणी मालक अवैध कटाईचे लाकूड बेवारस टाकून संधी साधताच ते कापण्यास नेतात, अशी विश्वसनीय माहिती आहे. परतवाडा येथे लाकूड बाजारात बुधवारी १०० टन आडजात लाकूड बेवारस ठेवण्यात आले आहे. यात गोंदण, महारुख, कडूनिम लाकडाचा समावेश आहे. तसेच अचलपूरच्या हिरापुरातही आडजात लाकूड कापून आणले आहे. (प्रतिनिधी)
अवैध लाकूड कटाई रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरुच आहे. परतवाडा, अचलपुरात अवैधरित्या आडजात लाकूड आणल्या जात असेल तर आरागिरण्यांची तपासणी करून कायदेशीर कारवाई केली जाईल.
- हेमंत मिणा
उपवनसंरक्षक, अमरावती.