परतवाड्यात अवैध लाकूड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:04 AM2017-12-29T01:04:45+5:302017-12-29T01:04:55+5:30
परतवाडा लाकूड बाजारात नीम, पिंपळ, बाभूळ व काटसावर आदी प्रजातीचे आडजात लाकूड विनापरवाना आढळल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध वनविभागाने गुरुवारी गुन्हा नोंदविला आहे. १.३९० घनमीटर आडजात लाकूड असून, ११ हजार १५१ रुपये बाजारमुल्य आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : परतवाडा लाकूड बाजारात नीम, पिंपळ, बाभूळ व काटसावर आदी प्रजातीचे आडजात लाकूड विनापरवाना आढळल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध वनविभागाने गुरुवारी गुन्हा नोंदविला आहे. १.३९० घनमीटर आडजात लाकूड असून, ११ हजार १५१ रुपये बाजारमुल्य आहे.
परतवाडा, अचलपूर बाजारपेठ हे अवैध लाकूड वाहतूक, विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. त्याअनुषंगाने उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांच्या आदेशानुसार लाकूड बाजाराची तपासणी करून ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यात आले. त्यानुसार वनपरिक्षेत्राधिकारी एस.बी. बारखडे यांनी परतवाडा लाकूड बाजारात धाडसत्र राबविले असता, काही ठिकाणी आडजात प्रजातीचे लाकूड बेवारस स्थितीत आढळले. सदर लाकडांचे मोजमाप करुन ते ताब्यात घेण्यात आले. मात्र, शेवटपर्यत आडजात लाकूड कुणाचे, यासाठी कोणीही समोर आले नाही. त्यामुळे जप्त केलेले लाकूड ताब्यात घेऊन परतवाडा वनविभागाच्या डेपात जमा करण्यात आले आहे.
भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१, ४२ व महाराष्ट्र वन नियमावली २०१४ चे नियम ३१, ४७ चे उल्लंघन झाल्याप्रकरणी प्रथम गुन्हा क्रमांक १८/१७ अन्वये २८ डिसेंबर २०१७ रोजी ही कारवाई आरएफओ एस.बी. बारखडे यांच्या मार्गदर्शनात वनपाल बी.आर. झामरे, वनरक्षक व्ही.बी. पाथ्रीकर, जे.टी. भारती, जे.आर. पालीयाड, एन.व्ही. ठाकरे, एस.व्ही. भोंडे, एस.सी. बछले, पी.के. वाटाणे आदींनी केली आहे.