ब्रिटिशकालीन गुरांचा बाजार समस्यांच्या विळख्यात

By admin | Published: April 14, 2017 12:16 AM2017-04-14T00:16:55+5:302017-04-14T00:16:55+5:30

वरूड तालुक्यातील ब्रिटिशकालीन एकमेव बैलबाजार आणि धान्य बाजारपेठ सद्यस्थितीत समस्यांच्या विळख्यात सापडला आहे.

Recognition of British cattle market problems | ब्रिटिशकालीन गुरांचा बाजार समस्यांच्या विळख्यात

ब्रिटिशकालीन गुरांचा बाजार समस्यांच्या विळख्यात

Next

स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष : मिरची बाजारावरही अवकळा
राजुराबाजार : वरूड तालुक्यातील ब्रिटिशकालीन एकमेव बैलबाजार आणि धान्य बाजारपेठ सद्यस्थितीत समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. एकेकाळी नावारूपास आलेल्या या बाजारपेठेची दुरवस्था झाली आहे.
ही बाजारपेठ विदर्भात नावारूपास आली होती. येथील हिरव्या मिरचीची आंतरराज्यीय बाजारपेठसुद्धा प्रसिद्ध आहे. मात्र, या बाजारपेठेवरही काही वर्षांपासून अवकळा आली आहे. स्थानिक राजकीय नेत्यांचे या बाजारपेठेकडे दुर्लक्ष होत असल्याने समस्या अधिकच गंभीर झाल्या आहेत. स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असून विदर्भातील ब्रिटिशकालीन गुरांचा बाजार हळूहळू काळाच्या पडद्याआड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजुराबाजार सर्कल हे राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद अध्यक्षापर्यंत पदे मिळविणारा हा परिसर आहे. यातच माजी आमदार, माजी मंत्र्यांचा परिसर आहे. परंतु ‘नाव मोठे दर्शन खोटे’ या उक्तीप्रमाणे विदर्भातील ब्रिटिशकालीन प्रसिद्ध गुरांच्या बाजारपेठेची पत राखण्यास लोकप्रतिनिधी असमर्थ ठरले आहेत. आमला-पुलगाव या मिल्ट्रीच्या रस्त्यावर असलेल्या राज्य महामार्गावर ही बाजारपेठ आहे. येथून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिरची पाठविली जाते. येथील गुरांच्या बाजारात विदर्भासह खानदेशातूनसुद्धा गुरे विक्रीला आणली जातात.
या बाजारात ब्रिटिशकालीन लोखंडी खांब गुरे बांधण्याकरिता लावण्यात आले होते, तर शेतकऱ्यांसाठी शौचालयेदेखील होती. इतकेच नव्हे तर मुक्कामाकरिता मडग्या, बाजार ओटे तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. परंतु या बाजाराचे राजकारण्याच्या हेवेदाव्यात संपूर्ण वैभव हरपले आहे. आतील प्रसाधनगृहांची मोडतोड झाली असून गुरे बांधण्यासाठी लावलेले लोखंडी खांबसुद्धा तुटले आहेत. मडग्या अतिक्रमणाने लोप पावल्या आहेत. घाणीचे साम्राज्य कमालीचे वाढले आहे. दिवाबत्तीची सुविधा नाही. हॉटेलच्या सांडपाण्याची विल्हेवाट होत नसल्याने वराहांचा त्रास वाढला. या बाजारासोबत १०० खेड्यांचा संपर्क असूनसुद्धा बसस्थानक नसल्याने रस्त्यावर बसेस उभ्या राहतात.
महिलांसाठी शौचालय आणि मुत्रीघर नसल्याने महिलांची कुचंबणा होते. येथील बाजारात हजारो नागरिक खेड्यापाड्यांतून येत असून धान्यबाजार, कोंबडी, मिरची बाजार तसेच गुरांच्या बाजाराचे वैभव हरपत चालले आहे. बाजार समितीकडून सुद्धा याकडे दुर्लक्ष असून केवळ राजकीय हेवेदाव्यात राजुरा बाजारचा विकास खुंटल्याची चर्चा आहे. बाजारात मटणविक्री उघड्यावर केली जात असल्याने रस्त्याने जाणाऱ्या वाहनांचा धूर व धूळ उघडया मांसावर बसल्याने विविध आजार बळावत आहेत. परंतु कोणीही मांस विक्रेत्याची चौकशी अथवा बोकडाची तपासणी करीत नाही. यामुळे केवळ जागेच्या वादामुळे बाजाराची जागा नेमकी कुणाची, हा प्रश्न वेळोवेळी निर्माण होतो. निवडणूक आटोपली की पुन्हा हा मुद्दा दुर्लक्षित होतो. बाजारापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून येथे आधुनिक सुसज्ज अशी बाजारपेठ निर्माण झाली असती, असाही एक सूर आहे.

Web Title: Recognition of British cattle market problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.