मेळघाटातील १०५ बंदुका जप्त करण्याची वन्यजीव विभागाकडून शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 06:15 PM2019-03-02T18:15:37+5:302019-03-02T18:16:05+5:30
मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यात एकूण १०५ जणांकडे परवानाप्राप्त बंदुका आहेत. यात पीकसंरक्षणार्थ ८७, तर आत्मसंरक्षणार्थ १८ बंदुका आहेत.
- अनिल कडू
अमरावती - मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यात एकूण १०५ जणांकडे परवानाप्राप्त बंदुका आहेत. यात पीकसंरक्षणार्थ ८७, तर आत्मसंरक्षणार्थ १८ बंदुका आहेत.
बंदूक परवानाधारकांनी परवाना नूतनीकरणाकरिता धारणी येथील सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकाºयांकडे अर्ज सादर केले आहेत. उपविभागीय अधिकाºयांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभाग व सिपना वन्यजीव विभागाकडून नूतनीकरणासंदर्भात स्वयंस्पष्ट अहवाल मागविला. वन्यजीव विभागाने बंदूक परवान्याचे नूतनीकरण न करता, त्या बंदुका जप्त करण्याची शिफारस केली आहे.
बालाजी दादू (मेमना), भैयालाल सोनाजी पटेल (तारुबांदा), छोटेलाल भैयालाल कासदेकर (नांदुरी), हिराजी बाटू, चिमोटे (मालूर), पुण्या बाटू कोरकू (मालूर), ओंकार जगन जावरकर (पोटीलावा), हिरालाल लंगडा (लवादा), भुºया खुडी कोरकू (मांगीया), नंदलाल श्रीपाल धिकार (चौराकुंड), सानू आडा मावसकर (तांगडा), बाटू मनांक जावरकर (नांदुरी), भुरेलाल बाबू ओझा (मांगीया), हिरालाल नंदा चिमोटे (मालूर फॉरेस्ट) या १३ लोकांकडील बंदुका जप्त करण्याची शिफारस गुगामल वन्यजीव विभागांतर्गत मेळघाट व्याघ्र प्रकल्प उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी उपविभागीय अधिकाºयांकडे केली आहे. बंदूकधारक शस्त्राचा दुरुपयोग करून वन व वन्यजिवांचे नुकसान करू शकतात, असा आक्षेपही वन्यजीव विभागाने वर्तविला आहे. आक्षेप नोंदविताना चिखलदरा परिक्षेत्रातील वाघ शिकार प्रकरण २२/१९ दि. ०१/१२/२०१८ चा उल्लेख उपवनसंरक्षकांनी केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचे म्हटले आहे.
उपनवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी बंदूक परवाना नूतनीकरण न करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण), धारणी व चिखलदरा पोलीस ठाणे, सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक आणि तारुबांदा, हरिसाल, ढाकणा, चिखलदरा येथील वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी कळविले आहे.
चिखलदरा तालुक्यात यांच्याकडे आहे शस्त्र परवाना
चिखलदरा तालुक्यात चंद्रकुमारसिंह लालबहादूर किल्लेदार व लक्ष्मण किसन चव्हाण (चिचखेडा), भिकमचंद राधेश्याम खंडेलवाल (चिखलदरा), रघुनाथ कृष्णाजी येवले व मधुकर कृष्णाजी येवले (चुर्णी), लक्ष्मीनारायण अंबाचरण शिवहरे (टेंब्रुसोंडा) तसेच तारूबांदा, चौराकुंड, कुंड, कोहा येथील वनपाल अशा दहा लोकांकडे आत्मसंरक्षणार्थ, तर पीक संरक्षणार्थ ४४ जणांकडे बंदुकी आहेत.
धारणी तालुक्यात यांच्याकडे आहे शस्त्र परवाना
धारणी तालुक्यात शेख अहमद शेख अशरफ (बैरागड), अ. फहीम अ. अजीम, अशोक वासुदेवराव खार्वे, अ. सहिद अ. वहीद, लक्ष्मणगीर दत्तुगीर गिरी (धारणी), शेख इकबाल शे. इस्माइल (बैरागड), हबीब खान इस्माईल खान (कुसुमकोट), अलबदसिंग हुकूमचंद राठोड (सावलीखेडा) या आठ लोकांकडे आत्मसंरक्षणार्थ, तर ४३ जणंकडे पीक संरक्षणार्थ बंदुकी आहेत.
मेळघाटात बंदुकीचा दुरुपयोग करून वन व वन्यजिवांचे नुकसान करण्याचे नाकारता येत नाही. बंदूकधारकाचा बंदूक परवाना रद्द करून बंदूक जप्त करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
- विनोद शिवकुमार, उपवनसंरक्षक, गुगामल वन्यजीव विभाग