अर्ज नसताना विनंती बदलीची शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:15 AM2021-08-29T04:15:32+5:302021-08-29T04:15:32+5:30
लोकमत विशेष नरेंद्र जावरे : परतवाडा : विनंती बदल्यांचे अधिकार वनभवनाने मुख्य वनसंरक्षकांकडे दिले. वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांची ...
लोकमत विशेष
नरेंद्र जावरे : परतवाडा : विनंती बदल्यांचे अधिकार वनभवनाने मुख्य वनसंरक्षकांकडे दिले. वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांची प्रादेशिक वनपरिक्षेत्राकरिता अर्ज नसताना केवळ राजकीय दबावातून, तर दोन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची अनैसर्गिक बदलीसाठी शिफारस केली. यामुळे वनभवनात नाराजीचा सूर उमटला आहे. राजकीय दबाव आणणाऱ्या दोन्ही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत आहे.
मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी या वृत्तीय स्तरावरील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदली समितीच्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या शिफारशीने वनभवन बदली प्रस्तावास मान्यता देते. परंतु, विनंती बदल्यांच्या बैठकीत मुख्य वनसंरक्षकांना आशिष कोकाटे व इतर सहा जणांच्या अनैसर्गिक बदलीसाठी शिफारस केली गेली. विशेष म्हणजे, अर्ज नसताना मोर्शी वनपरिक्षेत्राकरिता आशिष कोकाटे यांची शिफारस करण्यात आली. याकरिता उपवनसंरक्षक (मुख्यालय) यांनी मध्यस्थी केल्याची माहिती सूत्रांची आहे. समितीच्या सदस्य, सचिवांनी त्यावर हरकत घेतली. आशिष कोकाटे व कैलास भुंबर यांच्या बदलीचे प्रस्ताव वनभवनने नाकारले तरी एक वर्ष झालेल्या विवेक लाड, योगेश तापस, महेश धंदर यांची मेळघाट व्याघ्र प्रकल्पाबाहेर बदली केली. या बदल्यांना न्यायालयात दाद दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
---------------
उपवनसंरक्षकांची करामत
जयोती बॅनर्जी यांच्याकडे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकांचा अतिरिक्त कार्यभार आहे. वनरक्षक, वनपाल आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत उपवनसंरक्षकांना अधिकार दिले आहे. बदली प्रस्तावात ज्या सात वनपरिक्षेत्र अधिकारी यांची शिफारस केली त्यात या उपवनसंरक्षकांच्या माध्यमातून वनपरिक्षेत्राधिकाऱ्याने सूत्र हलविल्याची माहिती आहे. बदली पती-पत्नी एकत्रीकरणासोबत एका खासदाराचा दबाव आणला. एका सेवानिवृत्त सहायक वनसंरक्षकाने मोर्शीकरिता फिल्डिंग लावली.
चांदूर रेल्वे रिक्त ठेवण्याचे कारण काय?
प्रादेशिक वनविभागातील चांदूर रेल्वे परिक्षेत्र वर्षभर रिक्त ठेवण्यात आले. महत्वाचे परिक्षेत्र रिक्त ठेवण्यामागचा उद्देश काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण लाडक्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला बॅचमेटला या ठिकाणी पोस्टिंग मिळवून द्यावयाची होती आणि मित्राला वन्यजीव विभागातून आणण्यासाठी मुख्यालय उपवनसंरक्षकांनी शिफारस केल्यानंतर चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात वृत्तीय बदलीत पोस्टिंग देण्यात आली.
सरकारी अभियंता की कंत्राटदार?
चांदूर रेल्वे आणि वडाळी वनपरिक्षेत्रात सध्या एका अभियंत्याची चालती आहे. जिल्हा परिषदेच्या आस्थापनावर कार्यरत कनिष्ठ अभियंता नातेवाइकांच्या नावे चांदूर रेल्वे आणि वडाळी वनपरिक्षेत्रातील कामांचे कंत्राट घेत आहे. शासकीय नोकरीत असताना तो वडाळी आणि चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांमागे दिसून येतो. मध्यंतरी या कनिष्ठ अभियंत्याला सीईओंनी निलंबित केले होते.