प्रलंबित कृषिपंपांच्या जोडणीसाठी तंबी
By admin | Published: June 11, 2017 12:07 AM2017-06-11T00:07:21+5:302017-06-11T00:07:21+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागणी करून व यासाठी पैसे भरणा करून देखील त्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी देण्यात आली नाही.
पालकमंत्री संतापले : संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागणी करून व यासाठी पैसे भरणा करून देखील त्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी देण्यात आली नाही. ही बाब पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गांर्भीयाने घेतली आहे. ह्या जोडण्यांचे काम त्वरित करण्यात यावे व यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात पाच हजार ६०० कृषिपंपांच्या जोडण्या प्रलंबित आहेत.
पालकमंत्र्यांनी शिवारफेरीच्या निमित्ताने जिल्ह्यातील १२३ गावांना भेटी दिल्यात, या संपर्क अभियानाच्या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यावेळी अनेक गावांतील शेतकऱ्यांनी ही बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिली. या पार्श्वभूमीवर वीजजोडणी संदर्भात तक्रारींचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिलेत. बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित बांगर, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुहास मेहेत्रे, कार्यकारी अभियंता डी.बी. मोहोड, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या अर्जावर वर्षानुवर्ष जर कार्यवाही होत नसेल तर ही बाब गंभीर आहे. यासाठी संबधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी. कामासाठी नियुक्त कंत्राटदार जर ऐकत नसेल तर याविषयी वरिष्ठांना कळविणे आवश्यक आहे. शेतकरी, नागरिकांच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची दर १५ दिवसांत बैठक घ्यावी व अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. रोहीत्र बसविणे किंवा नादुरूस्त असलेले बदलविणे आदीविषयी प्राप्त अर्जांवरदेखील कार्यवाही करावी. विहीत मुदतीत सौर कृषिपंपांचे काम व उद्दिष्ट पूर्ण होणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याचे व वाकल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, याची त्वरित दखल घेऊन कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना सौजन्याची वागणूक द्यावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.
वीज अपघाताची सर्व प्रकरणे मंजूर करा
अनेकदा विजेच्या धक्कयाने अपघात होवून नागरिक दगावतात. त्या व्यक्तींच्या परिवाराने मदतीसाठी केलेले अर्ज नामंजूर करण्याचे प्रकार घडतात. यापुढे असा एकही प्रकार होता कामा नये, असी तंबी त्यांनी दिली. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांसी सौजन्याने वागले पाहिजेत. त्यांच्या मागण्या समजवून घेवून त्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.व त्यांना वस्तूस्थितीची माहिती दिली पाहिजे असे पालकमंत्र्यांनी सांगीतले. जिल्ह्यात ४ लाख १५ हजार शेतकरी आहेत व १७०० कृषिपंप वाटपाचे उद्दीष्ट आहे. हे उद्दीष्ट विहीत कालावधित पूर्ण करावे व शेतकऱ्यांप्रति अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका ठेवावी, असे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सांगितले.