रस्ते खोदकामावरुन महापालिकांची कानउघाडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2017 12:07 AM2017-05-23T00:07:16+5:302017-05-23T00:07:16+5:30
भुयारी गटार योजना आणि मलनि:स्सारण प्रकल्पासाठी महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्त्यांच्या खोदकामावरून ‘सरकार’ने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाची कानउघाडणी केली आहे.
प्राधान्यक्रम निश्चित : निधीचा अपव्यय टाळावा, पाणीपुरवठा, मलनि:स्सारण प्रकल्पानंतरच रस्ते बांधकाम
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भुयारी गटार योजना आणि मलनि:स्सारण प्रकल्पासाठी महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्त्यांच्या खोदकामावरून ‘सरकार’ने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाची कानउघाडणी केली आहे. निधीचा अपव्यय आणि रस्त्यांचे खोदकाम टाळण्यासाठी नगरविकास विभागाने विकास प्रकल्पांचा प्राधान्यक्रम नव्याने निश्चित केला आहे.
पाणीपुरवठा किंवा मलनि:स्सारण प्रकल्प राबविणाऱ्या शहरांतील रस्ते बांधकाम ठराविक क्षेत्रांमध्ये पाणी पुरवठा, मलनि:स्सारण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर करावीत, असे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत. तुर्तास अमरावती शहरात भुयारी गटार योजनेसाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदले जात आहेत. त्याअनुषंगाने या निर्देशांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज्यातील विविध शहरांमध्ये सध्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान, अमृत अभियानामधील विविध पाणीपुरवठा व मलनि:स्सारण प्रकल्पांचे काम सुरू आहे. काही शहरांमध्ये रस्त्यांची कामे सुद्धा सुरू आहेत.
प्रकल्पांमध्ये एकसूत्रता आणा
अमरावती : आधी रस्ते बांधायचे, मग ते पाणीपुरवठा किंवा मलनि:स्सारण प्रकल्पांसाठी खोदायचे, त्यानंतर त्याच रस्त्यांच्या बांधकामासाठी पुन्हा शासनाकडे निधीची मागणी करायची, असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे निधीचा अपव्यय होत असल्याचे निरीक्षण शासनाने नोंदविले आहे. हा अपव्यय टाळण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना नव्याने मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातील पाणी पुरवठा,मलनि:स्सारण तसेच रस्ते बांधकाम करताना निधीचा अपव्यय टाळण्यासाठी कामाचा प्राधान्यक्रम ठरविणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. विविध प्रकल्पांमध्ये एकसूत्रता आणून निधीचा योग्य वापर करून दर्जेदार मालमत्ता निर्माण करण्याच्या उद्देशाने हे प्राधान्यक्रम ठरवून देण्यात आलेत. ज्या शहरांमध्ये अमृत किंवा महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत पाणीपुरवठा किंवा मलनि:स्सारण प्रकल्प राबविले जात असतील, तेथे रस्ते बांधकाम तुर्तास करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
रस्ते प्रकल्प पुढे ढकलण्याच्या सूचना
रस्त्यांचे बांधकाम पुन्हा करावे लागणार असेल तर त्याठिकाणी पाणीपुरवठा, मलनि:स्सारण प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यंत रस्ते बांधकाम करू नये, रस्त्यांची कामे पुढे ढकलण्यात यावीत. तसेच सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामे देखील पुढे ढकलण्यात यावीत. रस्ते बांधकामावरील निधी खर्च करण्याची मुदत संपली असेल तर अशा निधीचा विनियोग करण्यासाठी संबंधित पाणीपुरवठा, मलनि:स्सारण प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत.
पुन्हा खोदू नयेत रस्ते
जेथे पाणीपुरवठा व मलनि:स्सारण प्रकल्पांसोबत समांतरपणे रस्त्यांची कामे केली जात असतील तेथे हे रस्ते अन्य प्रकल्पांसाठी पुन्हा खोदावे लागणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना महापालिका व नगरपालिकांना दिल्या आहेत.