विद्यापीठ क्रीडा समितीत नियुक्त्यांची फेरपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 10:54 PM2017-08-25T22:54:51+5:302017-08-25T22:55:24+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात क्रीडा प्रकाराशी संबंधित विविध तदर्थ समित्या गठीत झाल्यानंतर ......
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात क्रीडा प्रकाराशी संबंधित विविध तदर्थ समित्या गठीत झाल्यानंतर यात मर्जीतील लोकांच्याच नियुक्त्या झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने संंबंधितांचे बायोडाटा तपासले जात असून पात्र असेल तरच समितीत नियुक्ती, अशी भूमिका गुरुवारी कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी घेतली आहे. मात्र, नियुक्त्यांची फेरतपासणी सुरु झाल्याने ‘सेटींग’ उघडकीस येईल, असे संकेत आहेत.
विद्यापीठात क्रीडा प्रकारातील तदर्थ समिती गठीत करताना मर्जीतील आणि जवळीक असलेल्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आल्याच्या आरोपाच्यता पार्श्वभूमिवर कुलगुरु चांदेकर यांनी सदर समितीमधील अध्यक्ष, सदस्यांचे नियुक्त्यांची पुनर्तपासणी केली जाणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. क्रीडा प्रकाराशी संबंधित तदर्थ समितीत वेगवेगळ्या लोकांची वर्णी लावण्यात आली आहे. यात क्रिकेट, हॉकी, खो-खो, टेबल टेनीस, शरीर सौष्ठव, जलतरण आदी समित्यांचा समावेश आहे. या समितीत नियुक्ती करताना अनुभव शून्य असलेल्यांची महत्वाच्या तदर्थ समितीवर नियुक्ती करण्यात आल्याची तक्रार थेट कुलगुरुंकडे झाली आहे. मात्र सदर समितींवर नियुक्तीसाठी सदस्यांची नावे ही वेगवेगळ्या स्तरावर येत असल्याचे कुलगुरुंनी मान्य केले.विद्यापीठाला सर्वच क्षेत्रात बदल अपेक्षित आहे. त्यामुळे काही तदर्थ समितीवर नियुक्ती करताना सहाजिकच बदल अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. काही समित्यांवर नियुक्तीत अन्याय झाल्यामुळे अनेकांनी समितीमधून राजीनामा देखील कु लगुरुंकडे सादर केला आहे. तर काही सदस्यांनी स्वत: कुलगुंची भेट घेऊन अन्याय झाल्याची कैफियत मांडली आहे. मात्र, क्रीडा प्रकारातील समितीवर झालेल्या नियुक्तीबाबत सदर व्यक्तींचे बायोडाटा, शिक्षण आदी बाबी तपासूनच निर्णय घेतला जाईल, असे कुलगुरु चांदेकर यांनी स्पष्ट केले आहे.
तदर्थ समित्यांवर नियुक्ती करताना निकष नाही. त्यामुळे पात्र व्यक्तींचीच नियुक्ती अपेक्षित आहे. तथापि काहींची नियमबाह्य किंवा चुकीच्या पद्धतीने नियुक्ती झाली असेल तर बायोडाटा तपासून फेरनिर्णय घेतला जाईल.
- मुरलीधर चांदेकर
कुलगुरु, संत गाडगेबाबा विद्यापीठ.