विदर्भातील प्रसिद्ध बहिरम यात्रेत रेकॉर्ड ब्रेक गर्दी; विक्रम मोडले, ८० हजारांवर नारळ फुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 01:22 PM2023-01-23T13:22:23+5:302023-01-23T13:24:22+5:30

जागोजागी बनले रोडगे

Record break crowd at Vidarbha's famous Bahiram Yatra; 80 thousand coconuts burst | विदर्भातील प्रसिद्ध बहिरम यात्रेत रेकॉर्ड ब्रेक गर्दी; विक्रम मोडले, ८० हजारांवर नारळ फुटले

विदर्भातील प्रसिद्ध बहिरम यात्रेत रेकॉर्ड ब्रेक गर्दी; विक्रम मोडले, ८० हजारांवर नारळ फुटले

Next

परतवाडा (अमरावती) : बहिरम यात्रेत संक्रांतीनंतरच्या रविवारी यात्रेकरूंची एकच गर्दी उसळली होती. यात्रेतील या तुफान गर्दीने या आधीचे गर्दीचे विक्रम मोडले असून बहिरम मंदिरावर दर्शनार्थींकडून ८० हजारांच्या वर नारळ फोडले गेले.

संक्रांतीमुळे मागील रविवारी बहिरम यात्रा ओस पडली होती. संक्रांतीनंतरच्या या रविवारी मात्र महिलांची गर्दी लक्षवेधी ठरली आहे. एरवी दुपारनंतर यात्रेत गर्दी वाढते. पण,या रविवारी सकाळी ११ पासूनच यात्रेकरूंची यात्रेत गर्दी उसळली. ही उसळलेली गर्दी सायंकाळी उशिरापर्यंत ही कायम राहिली. मंदिरावर दर्शनार्थींच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत ही या दर्शनार्थींच्या रांगा खंडल्या नव्हत्या. गर्दीमुळे मंदिर व्यवस्थापनाला यात्रेकरूंकरिता पायऱ्या चढण्याकरिता,तर डांबरी रस्ता खाली उतरण्याकरिता असा एकदिशा ठेवावा लागला.

रोडग्याच्या जेवणाला गर्दी

बहिरम यात्रा म्हणजे रोडग्याचे जेवण रविवारी यात्रेत रोडग्याचे जेवण देणाऱ्यांची व घेणाऱ्यांची सर्वाधिक गर्दी बघायला मिळाली. जेवण देणाऱ्यांची सकाळपासूनच यात्रेत वर्दळ होती. काहींनी शनिवारी सायंकाळी यात्रेत दाखल होत स्वयंपाकाकरिता आवश्यक जागा काबीज केल्या होत्या. वेळेवर पोहोचणाऱ्या काही यात्रेकरूंना शोधाशोध करूनही स्वयंपाकाकरिता यात्रेत जागा मिळू शकली नाही. यात काहींना शेतासह काशी तलाव परिसर,परतवाडा, बोदड,कारंजा बहिरम व बैतूल मार्गावर रस्त्याच्या कडेला जिथे जागा मिळेल तेथे स्वयंपाक बनवावा लागला. यादरम्यान गर्दीत जेवणाचे नियोजित ठिकाण शोधताना अनेकांना चांगलीच कसरत करावी लागली.

वाहतूक वळविली

यात्रा परिसरातून जात असलेला परतवाडा-बैतूल राष्ट्रीय महामार्ग यात्रेकरूंच्या गर्दीने खच्चून भरला होता. गर्दी दरम्यान या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खरपीपासूनच वळविण्यात आली होती.

पार्किंग हाऊसफुल

यात्रा परिसरातील सर्वच पार्किंग हाऊसफुल झाले होते. मंदिरावरील पार्किंग बंद ठेवण्यात आले होते. मंदिरावर येणाऱ्या वाहनांना मज्जाव केला गेला. दरम्यान पार्किंगमध्ये पैसे देऊनही यात्रेकरूंना आपले वाहन लावायला जागा मिळू शकली नाही. त्यामुळे जागा मिळेल तेथे यात्रेकरूंना आपली वाहने थांबवावी लागली. यात परतवाडा, बैतूल ,बोदड, कारंजा बहिरम मार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. यात्रेकरूंना चांगलीच पायपीट करावी लागली.

Web Title: Record break crowd at Vidarbha's famous Bahiram Yatra; 80 thousand coconuts burst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.