बहिरमात रेकॉर्डब्रेक गर्दी, कोरोना नियमाकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 12:26 PM2021-02-01T12:26:31+5:302021-02-01T12:28:33+5:30
Amravati News श्रीक्षेत्र बहिरमला यंदा यात्रा नसतानादेखील रविवारी भाविकांची लक्षवेधक गर्दी राहिली. यावर्षीची ही रेकॉर्डब्रेक गर्दी ठरली.
अनिल कडू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : श्रीक्षेत्र बहिरमला यंदा यात्रा नसतानादेखील रविवारी भाविकांची लक्षवेधक गर्दी राहिली. यावर्षीची ही रेकॉर्डब्रेक गर्दी ठरली.
पौष रविवारला दरवर्षीच बहिरमबाबाच्या दर्शनाला यात्रेनिमित्त भक्तांची गर्दी राहते. पण, यंदा यात्रेअभावी कोरोनामुळे ही गर्दी थांबली होती. दरम्यान रविवार, ३१ जानेवारीला ही गर्दी पहिल्यांदा बघायला मिळाली.
यात जवळपास ५० हजारांवर भाविकांनी बहिरमबुवाचे दर्शन घेतले. भाविकांना दर्शनाकरिता रांगेत बराच वेळ थांबावे लागले. चालत राहावे लागले. बाहेरून ओट्यावरूनच त्यांना बहिरमबुवाचे दर्शन घ्यावे लागले. मंदिर व्यवस्थापनाने कुणालाही आत, गर्भगृहात प्रवेश दिला नाही.
दरम्यान भाविकांनी मोठ्या श्रद्धेने बहिरमबाबाला रोडग्याचा नैवद्य चढविला. कणकेचे हजारो दिवे अर्पण केलेत. नारळही मोठ्या प्रमाणात फोडलेत. आिदवासी बांधवही सकाळीच बहिरम परिसरात पोहचलेत. त्यांनी आपले नवसही फेडलेत. नवसापोटी आणलेले बकरे, बोकूड, त्यांनी पायरीने मंदिराच्या घंट्यापर्यंत आणलेत. वरच्या अखेरच्या पायरीवरच त्यांचे पूजन करून परत त्यांना खाली घेऊन गेलेत आणि वनसाच्या जेवणाचा सामूहिक आस्वाद घेतला.भाविक आपापल्या वाहनाने सकाळपासूनच बहिरममध्ये दाखल झालेत. यात दिवसभर भाविकांची ये-जा सुरू राहिली. मंदिराजवळील वाहनांचे पार्किग फुल्ल झाले होते. वरील पार्किंगमध्ये जागा शिल्लक न राहिल्यामुळे जिथे-तिथे भाविकांनी आपली वाहने उभी केली होती. यात मंदिरावर जाणाऱ्या रस्त्यावरच वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बराच वेळ वाहनांचा जामही यात चालला.
बहिरम परिसरात जागा मिळेत तेथे सर्वदूर अनेकांनी रोडग्याचे स्वयंपाक केले. शेतातही हे स्वयंपाक होते. यामुळे रोडग्याच्या भाजणीचा आणि हंडीतील भाजीचा सुगंध परिसरात यंदा पहिल्यांदा दरवळला. या जेवणासाठी येणाऱ्या आमंत्रितांची संख्याही लक्षवेधक होती. यातच भागवताच्या समाप्तीनिमित्त आयोजित महाप्रसादामुळे लोकांच्या गर्दीत अधिकच भर पडली.