नोंद कापसाची; घरी बोंडही नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:00 AM2020-06-06T05:00:00+5:302020-06-06T05:00:06+5:30
तालुक्यातील शासकीय कापूस खरेदी ही कापूस उत्पादक पणन महासंघाकडून सुरू आहे. ही कापूस खरेदी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, या कापूस खरेदीत मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचेच चांगभले होत असल्याचे सुरुवातीपासून बोलले जात आहे. व्यापारी कमी भावाने कापूस खरेदी करून शेतकऱ्यांचाच सातबारा लावून शासनाला कापूस विकत असल्याचा प्रकार येथे होत आहे. याबाबत अनेक तक्रारी झाल्या आहेत.
चेतन घोगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होऊ नये व त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी शासनाकडून हमीभावाने कापूस खरेदी सुरू असली तरी याचा लाभ मात्र मोठ्या प्रमाणात व्यापारी घेत असल्याची ओरड होत आहे. याच मुद्द्यावर प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत असला प्रकार समोर येत आहे. नाफेडकडे नोंदणी केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांच्या घरी कापसाचे बोंडही नसल्याचे चौकशीत समोर येत आहे. अशा शेतकऱ्यांनी केलेली नोंदणी रद्द होत असल्याने त्यांच्याकडून टोकन घेणाऱ्या व्यापाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
तालुक्यातील शासकीय कापूस खरेदी ही कापूस उत्पादक पणन महासंघाकडून सुरू आहे. ही कापूस खरेदी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, या कापूस खरेदीत मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचेच चांगभले होत असल्याचे सुरुवातीपासून बोलले जात आहे. व्यापारी कमी भावाने कापूस खरेदी करून शेतकऱ्यांचाच सातबारा लावून शासनाला कापूस विकत असल्याचा प्रकार येथे होत आहे. याबाबत अनेक तक्रारी झाल्या आहेत.
दरम्यान, यासंबंधी वृत्ताने संबंधित नोंदणी व नियंत्रण करणाऱ्या संस्था खडबडून जाग्या झाल्या व त्यांनी अंतिम टप्प्यात का होईना, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी कापूस आहे की नाही, याबाबत तपासणी सुरू केली. बहुतांश शेतकऱ्यांच्या घरी कापूसच आढळला नसल्याने त्यांनी नाफेडकडे केलेली नोंदणी गावातील सरपंच, पोलीस पाटील, सोसायटी कर्मचाऱ्यांसमक्ष तात्काळ पंचनामा करून रद्द करण्यात येत आहे. या धडक कारवाईने शेतकऱ्यांचा सातबारा घेऊन कापूस विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर चाप बसला आहे. खऱ्यांशेतकऱ्यांची कापूस खरेदीची प्रतीक्षा कमी झाली आहे. कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांचा सातबारा वापरून बोगस नोंदी करून शासकीय योजनेचा लाभ लाटणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ फौजदारी दाखल करण्याचे तेथील पालकमंत्र्यांनी जसे आदेश दिले, तसे आदेश स्थानिक प्रशासनाने दिल्याशिवाय या गोरखधंद्यास चाप बसणार नाही, अशा प्रतिक्रिया काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
टोकन विक्री दलाल सक्रिय
ज्या शेतकऱ्यांनी आपल्या सात-बारा दाखवून नाफेडकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे, पण त्यांच्याकडे कापूस नाही, अशा शेतकऱ्यांना काही दलाल भेटून, त्यांना पैशाची लालूच देऊन टोकन मिळवित आहेत. या माध्यामातून हे दलाल कापूस व्यापाऱ्यांकडून हजारो रुपये कमावित असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. काही दिवसांपासून ‘लोकमत’च्या अंकात कापसाच्या अशा हेराफेरीबाबत वृत्त प्रकाशित होत आहे. त्याची दखल घेऊन चौकशी सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
तालुक्यातील किती शेतकऱ्यांची कापूस खरेदी शिल्लक आहे, यासाठी तपासणी सुरू आहे. बहुतांश नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी कापूस नसल्याचा प्रकार समोर आला आहे. अशा शेतकऱ्यांच्या घरातील स्थितीचे पंचनामे करून त्यांंची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. लवकरच अहवाल पूर्ण होईल.
- स्वाती गुडधे
सहायक निबंधक
अंजनगाव सुर्जी