‘गजानन विजय ग्रंथा’चे विक्रमी सामूहिक वाचन
By admin | Published: June 19, 2015 12:39 AM2015-06-19T00:39:09+5:302015-06-19T00:39:09+5:30
पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून श्री संत गजानन महाराज सेवा समिती नागपूर, चांदूरबाजार व गो.सी. टोम्पे महाविद्यालय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विजयग्रंथाचे सामूहिक ...
सुरेश सवळे चांदूरबाजार
पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून श्री संत गजानन महाराज सेवा समिती नागपूर, चांदूरबाजार व गो.सी. टोम्पे महाविद्यालय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विजयग्रंथाचे सामूहिक महापारायणाचे आयोजन स्थानिक गो.सी. टोम्पे महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते.
त्यात चांदूरबाजारसह जिल्ह्यातीलच नव्हे, तर विदर्भातील भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. भाविकांकडून कोणतीही देणगी यावेळी आकारण्यात आली नाही. तरीही काही भाविकांनी येथे आयोजित महाप्रसादासाठी पंधरा हजार भाविकांना पुरेल इतक्या अन्नधान्य दान स्वरुपात दिले. भाविकांच्या सहकार्याने १५ हजार लाडूंचे वितरण यावेळी करण्यात आले.
श्री संत गजानन विजयग्रंथाच्या सामूहिक वाचनाला गुरुवारी सकाळी ६.३० पासून सुरूवात झाली. ग्रंथवाचनासाठी हा विजयग्रंथ मुखपाठ असलेले पुण्याचे गजानन खासनिक प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या वाचनापाठोपाठ उपस्थित पाच हजारावर भाविकांनी या २९ अध्यायांचे सहा तासांत वाचन केले. या सामूहिक वाचनाला तालुका, जिल्हाच नव्हे तर संपूर्ण विदर्भात भाविक उपस्थित होते. गुजरातेतील सूरत येथूनही भाविक आले होते. ४ हजारांवर महिलांची विक्रमी उपस्थिती होती. पुरुष वाचकांची संख्या ११०० च्या जवळपास होती. वेळेवर आलेल्या भाविकांमुळे वाचकांच्या संख्येत अधिकच वाढ झाली. या सामूहिक वाचन कार्यक्रमात पावसाचा अडथळादेखील आला नाही.
सामूहिक वाचनानंतर उपस्थित १५ हजारांवर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यात १५ हजारांवर मोतीचूरच्या लाडूंचे वितरण करण्यात आले. विजयग्रंथ नसलेल्या भाविकांना सेवा समितीकडून ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आला. आयोजनाची सर्व जबाबदारी जसे पूजन, महाप्रसाद, स्वच्छता, बैठक, सुरक्षा, जलव्यवस्था, आदींची जबाबदारी सेवासमिती व भाविकांनी स्वीकारली होती. पारायणकर्त्यांसह, गजानन भक्तांची लक्षणीय उपस्थिती व महिलांची विक्रमी संख्या पाहता परिसरात पोलीस विभागाने विशेष सुरक्षेचा बंदोबस्त ठेवला होता. यात वाहतूक विभागही सक्रिय झाला होता. आयोजनात गजानन सेवा समिती नागपूर, चांदूरबाजार, डोमकसह टोम्पे महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सेवा दिली.