शिवकुमार याच्यावर खुनाचा, रेड्डीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:13 AM2021-04-09T04:13:58+5:302021-04-09T04:13:58+5:30
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी निलंबित उपवनसंरक्षक आरोपी विनोद शिवकुमार याचेवर खुनाचा, तर त्याला पाठीशी घालणारा ...
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी निलंबित उपवनसंरक्षक आरोपी विनोद शिवकुमार याचेवर खुनाचा, तर त्याला पाठीशी घालणारा निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी याच्यावर सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, अशी मागणी आमदार रवि राणा यांनी राज्यपालांकडे केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ७ एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनाद्धारे आमदार राणा यांनी दीपाली आत्महत्या प्रकरण त्यांच्या पुढ्यात ठेवले. २५ मार्च रोजी रात्री ८ वाजता दीपाली यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यास भाग पाडणारा निलंबित उपवनसंरक्षक विनाेद शिवकुमार याच्यावर भादंविच्या ३०६ कलमान्वये धारणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, शिवकुमार याच्यावर भांदविच्या कलम ३०२, ३५४ अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार राणा यांनी केली आहे. दीपाली यांनी वरिष्ठ असलेले एम.एस. रेड्डी याला वारंवार हकिकत सांगितली. मात्र, रेड्डी याने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. त्यामुळे तिला आत्महत्या करावी लागली. परिणामी निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश गृह खात्याला द्यावे, अशी कळकळीची मागणी आमदार राणा यांनी केली आहे. दीपाली प्रकरणी मी स्वत: तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना तीनवेळा पत्रव्यवहार केला आहे. खासदार नवनीत राणा यांनी रेड्डी यांना भ्रमणध्वनीवर सांगितले. मात्र, रेड्डी हा अमानवीय प्रवृत्तीचा अधिकारी असून, त्याने विनोद शिवकुमार याची पाठराखण केली. दीपाली यांचे मनोबल खचले आणि त्यांनी जगातून निरोप घेतला. त्यामुळे विनोद शिवकुमार, एम.एस. रेड्डी या दोघांवरही खुनाचे गुन्हे नोंदवून दीपाली यांच्या कुटुंबीयांना न्याय प्रदान करावा, अशी विनंती राज्यपालांकडे राणांनी केली आहे.