बहिरम चेकपोस्टवर पठाणी वसुली
By admin | Published: June 21, 2015 12:32 AM2015-06-21T00:32:08+5:302015-06-21T00:32:08+5:30
खरपी येथील चेकपोस्टचे स्थानांतरण करून मध्यप्रदेश सिमेमध्ये अत्याधुनिक चेकपोस्ट व धरमकाट्याची व्यवस्था..
ओव्हरलोड ट्रकचालकांची लूट : आरटीओ अधिकाऱ्यांची ट्रान्सपोर्टसोबत सांगड
चांदूरबाजार : खरपी येथील चेकपोस्टचे स्थानांतरण करून मध्यप्रदेश सिमेमध्ये अत्याधुनिक चेकपोस्ट व धरमकाट्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र येथे काट्या लागण्यापूर्वी खरपी येथील चेकपोस्ट बंद करण्यात येऊन नवीन जागेत चेकिंग सुरू करण्यात आले आहे. यामुळे पुन्हा तीच परिस्थिती उद्भवली आहे. ट्रान्सपोर्ट व उपप्रादेशिक अधिकाऱ्यांची सांगड असून या माध्यमातून ओव्हरलोड ट्रक चालकांकडून लाखोंची वसुली सुरू आहे.
उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे संचालित चेकपोस्ट हे केवळ ओव्हरलोड ट्रक चालकांकडून वसुलीचे एकमेव काम करीत आहे. मध्यप्रदेश राज्य महामार्गावर ओव्हरलोड, भारी ट्रकच्या येण्यामुळे रस्त्याची स्थिती चिंताजनक होत आहे. तीन वर्षांपूर्वी परिसरातील आमदारांनी ८ ते १० ओव्हरलोड ट्रक पकडून आरटीओ यांना कारवाई करण्यासाठी प्रवृत्त केले होते. परंतु यानंतर प्रकरण ‘जैसे थे’ होऊन गेले. याबाबत दखल घेत आ. बच्चू कडू यांनी अमरावती आरटीओ कार्यालयात धाड टाकत खुर्ची फेकत आंदोलन केले होते. याचे कौतुकही करण्यात आले होते. अकोला, अमरावती, खामगाव, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा व नागपूर येथील मोठे ट्रान्सपोर्ट मालक या गोरखधंद्यामध्ये आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत जुळलेले असून ओव्हरलोड ट्रकच्या वाहतुकीसंदर्भात थेट दिल्लीपर्यंत व्यवहार करत असतात. प्रत्येक ट्रकचालकाला यासंदर्भात विशेष असे कार्ड वितरण करण्यात येत असते. ज्याला बैतुल मार्गावर कुठल्याही चेकपोस्टवर दाखविल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात येत नाही. वास्तविक ते ओव्हरलोड ट्रकवर २६ हजार रूपये टन दंड आकारण्याचा नियम आहे. परंतु ५ ते १० हजार रूपये टनाच्या हिशोबाने अवैधरीत्या रक्कम अधिकाऱ्यांना चुकविण्यात येत असते.
यानंतर विशिष्ट नंबरचे कार्ड संबंधित ट्रान्सपोर्ट चालकाकडे देण्यात येत असते. यावर जनप्रतिनिधींनी लगाम लावण्याची गरज निर्माण झाली आहे. असे न झाल्यास कोट्यवधी रुपयांचा रस्त्यावर खर्च केलेला निधी वाया जावून डांबरीकरण केलेल्या चारपदरी रस्त्याचे तीनतेरा वाजल्याशिवाय राहणार नाही. मध्यप्रदेशाहून येणाऱ्या मार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभाग, आरटीओ, वनविभाग, कस्टम अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना राहण्यासाठी अत्याधुनिक सुविधेसह इमारत सज्ज असून ती सद्यस्थितीत धूळखात असल्याचे चित्र आहे.
(तालुका प्रतिनिधी)
प्रत्येक वाहनामागे अवैध वसुली
मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी असलेल्या अत्याधुनिक चेकपोस्टची निर्मिती करण्यात आली असून याचे स्थानांतरण ११ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. परंतु सदर चेकपोस्टवर धरमकाटा बंद असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गत काळात खरपी या गावाच्या पुढे चेकपोस्ट होते. सदर चेकपोस्टवर दर दोन दिवसानंतर आरटीओ अधिकारी बदलण्यात येत होते. केवळ तीन कर्मचाऱ्यांवर सदर चेकपोस्ट चालत होता. जेथे कुठल्याही प्रकारचा काटा नव्हता. यामुळे ओव्हरलोड ट्रक चालक हे आरटीओ अधिकाऱ्यांना बनावट पावत्या दाखवून वेळ मारून नेत होते.