१७ रेल्वे प्रवाशांकडून ६५०० रूपये दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:44 PM2019-03-13T22:44:35+5:302019-03-13T22:45:23+5:30
येथील मॉडेल रेल्वे स्थानकावर वाणिज्य विभागाकडून विशेष मोहिमेंतर्गत बुधवारी सकाळी ८ वाजता १७ विनातिकीट प्रवाशांकडून ६५०० रूपये दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम निरंतरपणे सुरू असणार आहे. रेल्वे सुरक्षा बलाकडून रेल्वे मालमत्ता आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना आखल्या जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील मॉडेल रेल्वे स्थानकावर वाणिज्य विभागाकडून विशेष मोहिमेंतर्गत बुधवारी सकाळी ८ वाजता १७ विनातिकीट प्रवाशांकडून ६५०० रूपये दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम निरंतरपणे सुरू असणार आहे. रेल्वे सुरक्षा बलाकडून रेल्वे मालमत्ता आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना आखल्या जात आहेत.
मार्च महिन्यात सर्वच विभाग उत्पन्नवाढीसाठी आणि टार्गेट पूर्ण करण्यासाठी सरसावतात, हा दरवेळेचा अनुभव आहे. मात्र, अमरावती रेल्वेच्या वाणिज्य विभागाने कधीचेच वाणिज्य उद्दिष्ट पूर्ण केले आहे. परंतु अलीकडे फुकट्या प्रवासी वाढल्याच्या पार्श्वभूमिवर विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविली जात आहे. भुसावळ मध्य रेल्वे विभागातील वाणिज्य वरिष्ठांनी अशा प्रवाशांविरुद्ध धडक कारवाईचे आदेश बजावले आहे. बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानकाचे वाणिज्य विभागप्रमुख शरद सयाम यांच्या नेतृत्वात बुधवारी ही मोहीम राबविली. या कारवाईत अमरावती रेल्वे स्थानकावरील मुख्य तिकीट निरीक्षक किन्हीकर, तिकीट निरीक्षक साखरकर, देशमुख, वेलेकर, बोहते, बरडेकर, हर्षद राऊत, संदीप दुधे, आशिष घरडे आदी उपस्थित होते.
तिकीट न घेता प्लॅटफार्मवर प्रवेश
येथील मॉडेल रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म तिकीट न घेता बहुतांश प्रवासी ये-जा करतात. विनातिकीट प्रवास अथवा प्लॅटफार्म तिकीट न घेता रेल्वे स्थानकावर प्रवेश घेणे हे रेल्वे नियमानुसार गुन्हा आहे. मॉडेल रेल्वे स्थानकावरील तिकीट विक्रीचा आलेख बघितल्यास प्लॅटफार्म तिकीट घेण्याचे प्रमाण अल्पच आहे. दरदिवशी मॉडेल रेल्वे स्थानकावर विनातिकीट प्रवासी तपासणी मोहीम हाताळल्यास सर्वाधिक प्रवासी विनातिकीट आढळतील, हे वास्तव आहे.