अंगणवाडी सेविकांपासून पर्यवेक्षिका करतात वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:07 PM2018-07-21T23:07:58+5:302018-07-21T23:08:17+5:30
बीटवरील पर्यवेक्षिका आमच्याकडून अवैध वसुली करतात. त्यांना नकार दिल्यास मानसिक त्रास देतात, अशा आशयाचे लेखी निवेदन आ. वीरेंद्र जगताप यांना देताना अंगणवाडी सेविकांनी त्यांच्यावरील अन्यायाचा पाढाच वाचला. त्यांनी त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शनिवारी आमदारांच्या निवासस्थानी धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : बीटवरील पर्यवेक्षिका आमच्याकडून अवैध वसुली करतात. त्यांना नकार दिल्यास मानसिक त्रास देतात, अशा आशयाचे लेखी निवेदन आ. वीरेंद्र जगताप यांना देताना अंगणवाडी सेविकांनी त्यांच्यावरील अन्यायाचा पाढाच वाचला. त्यांनी त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शनिवारी आमदारांच्या निवासस्थानी धडक दिली.
२०१५ पासून अंगणवाडीमार्फत केळी-अंडी पुरविण्याची योजना होती. त्यामध्ये प्रत्येक अंगणवाडीकडून १५०० रुपये वसूल केले. मासिक अहवाल आॅनलाइन करण्यासाठी पैशांची मागणी केल्याचे उपस्थित सेविकांनी आमदारांना सांगितले. ते ऐकून अवाक् झालेल्या आमदारांनी तत्काळ बीडीओ सोनाली मातकर व महिला, बालकल्याण अधिकारी वर्षा व्यवहारे यांच्याकडे विचारणा केली. यावेळी प्रमिला सहारे, हेमलता आसोडे, उमा राऊत, रेखा राऊत, निलावती शेंडे, विद्या राऊत, कुसूम शेळके, अर्चना केणे, रेखा सयाम, सिंधू डबर, उज्ज्वला खवसे, सुनंदा स्वर्गे, उज्ज्वला घोडे, कुसूम बकाले, प्रमोदिनी फरकाडे, प्रमिला कंगाले, चंदा वडस्कर, वीणा वाढोणकर, सुमन पुनसे, नीलिमा वाढोणकर, पद्मा कुबडे, वंदना हिरूरकर, इंदिरा बनसोड आदींचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी के.एम. अहमद यांच्याशी चर्चा केली. तक्रार अतिशय गंभीर असून, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवला जाईल. सत्यता आढळल्यास कारवाईबाबत पत्र देणार आहे.
- वीरेंद्र जगताप, आमदार
माझ्याकडे एकाही अंगणवाडी सेविकेकडून अद्याप तक्रार प्राप्त झाली नाही.
- वर्षा व्यवहारे, महिला-बाल विकास प्रकल्प अधिकारी
आमच्या कार्यालयाकडे अंगणवाडी सेविकांवरील अन्यायाबाबत अद्याप लेखी तक्रार झालेली नाही.
- सोनाली मातकर,
बीडीओ, चांदूर रेल्वे