राज्यात पेसा क्षेत्रातील भरती करा; मंत्रालयात आदिवासी उमेदवारांचा ठिय्या
By गणेश वासनिक | Published: October 2, 2024 06:31 PM2024-10-02T18:31:43+5:302024-10-02T18:32:19+5:30
Amravati : यवतमाळात साखळी उपोषण, १३ जिल्ह्यांत १७ संवर्गांतील भरती रखडली
अमरावती : राज्यातील पेसा क्षेत्रातील १३ जिल्ह्यांत १७ संवर्गांमधील अंतिम शिफारस प्राप्त आदिवासी उमेदवारांना अद्यापर्यंत नियुक्ती आदेश मिळालेले नसल्यामुळे ३० सप्टेंबरपासून बेरोजगार आदिवासी उमेदवारांनी मंत्रालयाच्या बाहेरच ठिय्या मांडला आहे. मुलांजवळ पैसे नसल्यामुळे ते उपाशीपोटीच उघड्यावर मंत्रालयाबाहेर झोपले आहेत. तर यवतमाळात गत आठ दिवसांपासून आदिवासी उमेदवार साखळी उपोषणाला बसले आहेत.
पेसा भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. पेसा क्षेत्रातील बेरोजगार आदिवासी उमेदवारांना १५ सप्टेंबरपर्यंत नियुक्ती आदेश देण्यात येईल, अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २९ ऑगस्ट रोजी सह्याद्री अतिथी गृहावर पार पडलेल्या बैठकीत आदिवासी शिष्टमंडळाला दिली होती. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून अंतिम शिफारस प्राप्त आदिवासी उमेदवारांना १५ सप्टेंबरपर्यंत नियुक्ती आदेश मिळेल, या आशेने आदिवासींच्या शिष्टमंडळाने सरकारला सकारात्मक प्रतिसाद देत १ ऑगस्टपासून नाशिक व इतरही आदिवासीबहुल जिल्ह्यात सुरू असलेले उपोषण मागे घेतले होते. मात्र, अद्यापही अंतिम शिफारस झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील बेरोजगार आदिवासी उमेदवारांनी ३० सप्टेंबरला मंत्रालय गाठले. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १३ ऑक्टोबर २०२३ रोजी आणि महसूल व वन विभागाने १७ ऑक्टोबर रोजी पत्र काढून अनुसूचित क्षेत्रातील संपूर्ण भरती प्रक्रिया थांबविली आहे. त्यामुळे आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात १०० टक्के, ५० टक्के आणि २५ टक्के आरक्षित असलेली पदे अद्यापही रिक्त आहे. बिगर आदिवासी उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिनस्त राहून नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. मात्र, यातून केवळ आदिवासी उमेदवारांना वगळण्यात येऊन भेदभाव करण्यात आला आहे. पेसा क्षेत्रातील १७ संवर्गाची कायमस्वरूपी पदभरती तत्काळ करण्यात यावी. शिफारस पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात यावेत, यासाठी आदिवासी उमेदवार मंत्रालयात ठाण मांडून बसले आहे.
यवतमाळातही साखळी उपोषण
पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळण्यात यावे, यासाठी यवतमाळ येथील जिल्हा परिषदेसमोर २५ सप्टेंबरपासून आदिवासी उमेदवारांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला आठ दिवस झाले आहेत. गौरव गेडाम, अशोक आत्राम, आकाश मेश्राम, सूर्यकांत पेंदोर, वैभव कुडमथे, पंकज पेंदोर, रोहित मरसकोल्हे, बादल मडावी, मनोज गेडाम, रोशन चांदेकर, गोपाळ बोरीकर, अतुल कुळसंगे, शुभांगी पेंदोर, स्नेहा आडे, काजल किनाके, कल्याणी चांदेकर, पूजा मडावी, भाग्यश्री आत्राम, प्रांजली आत्राम, शीला अर्के आदी बेरोजगार आदिवासी उमेदवार उपोषणाला बसले आहेत.