अमरावती विद्यापीठात कुलसचिव, अधिष्ठाता पदभरतीचा मार्ग सुकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 07:16 PM2019-04-19T19:16:02+5:302019-04-19T19:17:23+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कुलसचिव आणि दोन अधिष्ठातापदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यपाल कार्यालयाने पदभरतीबाबत परवानगी दिली असून, १६ व १७ मे रोजी उमेदवारांच्या मुलाखती होतील.
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठात कुलसचिव आणि दोन अधिष्ठातापदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यपाल कार्यालयाने पदभरतीबाबत परवानगी दिली असून, १६ व १७ मे रोजी उमेदवारांच्या मुलाखती होतील. त्याअनुषंगाने विद्यापीठ प्रशासनाने कार्यक्रम जाहीर केला आहे.
लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने कुलसचिव आणि दोन अधिष्ठाता पदभरतीची प्रक्रिया राबविली होती. त्यानुसार उमेदवारांनी अर्जदेखील सादर केले. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनात पदभरतीसाठी मुलाखती घेण्याचे नियोजन चालविले असता लोकसभा निवडणूक १० मार्च रोजी जाहीर झाली. त्यानंतर ११ मार्चपासून आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे पदभरती पुढे ढकलली. मात्र, अमरावती, यवतमाळ-वाशिम, अकोला, बुलडाणा, वर्धा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आता आटोपली. परिणामी राज्यपालांनी विद्यापीठात पदभरतीसंदर्भात मुलाखती घेण्यास परवानगी दिली आहे.
अजय देशमुख हे २३ जानेवारी रोजी कुलसचिवपदाचा राजीनामा देऊन समकक्ष पदावर मुंबई विद्यापीठात रुजू झाले. रिक्त कुलसचिवपदासाठी ३२ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले, तर १८ जण पात्र ठरलेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेच्या अधिष्ठातापदासाठी आलेल्या १३ पैकी आठ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले. मानव्यशास्त्र (ह्यूमॅनिटी) अधिष्ठातापदासाठी प्राप्त पाचही अर्ज पात्र ठरले. कुलसचिवपदासाठी १६ मे रोजी १८ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील, तर १७ मे रोजी अधिष्ठाता पदांसाठी १३ उमेदवारांच्या मुलाखती होतील, असा कार्यक्रम विद्यापीठाने आखला आहे.
राज्यपालांकडून कुलसचिव व दोन अधिष्ठाता पदभरतीबाबत मुलाखती घेण्याची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार १६ मे रोजी कुलसचिव आणि १७ मे रोजी दोन अधिष्ठातापदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील . - हेमंत देशमुख, प्रभारी कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ