अहर्ता चवथी पास, ४५ टक्के अर्ज पदवीधरांचे; गावातल्या गावात नोकरी अन् १५ हजार रुपये पगार
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 12, 2023 15:29 IST2023-08-12T15:19:38+5:302023-08-12T15:29:43+5:30
शासनाने मंजूर पदांच्या तुलनेत ८० टक्के पदभरतीस मान्यता दिलेली आहे.

अहर्ता चवथी पास, ४५ टक्के अर्ज पदवीधरांचे; गावातल्या गावात नोकरी अन् १५ हजार रुपये पगार
अमरावती : महसूल विभागात गावपातळीवरचा शेवटचा दुवा व तलाठ्याचा सहायक या अर्थाने कोतवालपदास वेगळे महत्त्व आहे. यात कोतवालांची ११२ पदांची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. यासाठी किमान चौथी पास व वय ४० वर्षांपर्यंत ही प्रमुख अट असताना ८८ टक्के १२ वी पास ते पदव्युत्तर उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.
सध्याच्या काळात रोजगाराची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. त्यातही शासकीय नोकरी नोकरी मिळणे दुरापास्त आहे. अशा परिस्थितीत गावातल्या गावात नोकरी अन् नव्या नियमानुसार पगार १५ हजार असल्याने कोतवाल भरतीसाठी बहुसंख्य सुशिक्षित बेरोजगार १२ वी पास, पदवीधर ते पदव्युत्तर उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अनेक वर्षांपासून ही पदभरती रखडली होती. आता शासनाने मंजूर पदांच्या तुलनेत ८० टक्के पदभरतीस मान्यता दिलेली आहे.
जिल्ह्यात कोतवालांची एकूण ५२५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३८५ पदे यापूर्वी भरण्यात आलेली आहेत. त्यामुळे १४० पदे रिक्त आहेत व या रिक्त पदांपैकी शासनमान्यतेनुसार ८० टक्के म्हणजेच ११२ पदे भरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.