सात गावांत ‘रेड अलर्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 01:14 AM2019-07-06T01:14:55+5:302019-07-06T01:15:29+5:30
पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू, चिकनगुणिया, स्क्रब टायफस, स्वाईन फ्लू या साथीच्या आजारांसह डायरिया, कावीळ, कॉलरासारखे आजाराची शक्यता बळावते. त्याअनुषंगाने गतवर्षी ज्या गावांमध्ये साथरोगाचा संसर्ग झाला अशा सात गावांमध्ये ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू, चिकनगुणिया, स्क्रब टायफस, स्वाईन फ्लू या साथीच्या आजारांसह डायरिया, कावीळ, कॉलरासारखे आजाराची शक्यता बळावते. त्याअनुषंगाने गतवर्षी ज्या गावांमध्ये साथरोगाचा संसर्ग झाला अशा सात गावांमध्ये ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणेस सजग राहण्याचे निर्देश देण्यात आले असून आपातकाळासाठी राखीव पथक ठेवण्यात आले आहेत.
गतवर्षी स्क्रब टायफस या आजाराने ग्रामीण भागात थैमान घातले होते. शहराच्या तुलनेत डेंग्यूची तीव्रता कमी असली तरी ग्रामीण भागातही डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. तसेच तिवसा तालुक्यातील धारवाडा, चिखलदरा तालुक्यातील सोनापूर, लाखेवाडी, चोबिदा, चांदूर रेल्वेमधील सुपलवाडा, वरूडमधील मोरचूद आणि मोर्शीमधील येरला या गावांमध्ये मागील वर्षी पावसाळ्याच्या दिवसांत या आठ गावांमध्ये डायरिया व अन्य साथरोगांचा प्रकोप वाढला होता.
पावसामुळे वातावरणात रोगराई पसरविणाऱ्या जंतूंची उत्पत्ती होऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. पावसाळ्यामुळे ठिकठिकाणी कुजणारा कचरा, अडलेल्या कचºयामुळे पावसाचे साचणारे पाणी, चिखल आणि दलदल यामुळे साथीचे विविध आजार पसरण्याचा धोकादेखील निर्माण होऊ शकतो. त्यासाठी प्रत्येकाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची खबरदारी घेणे गरजेचे आहे. याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
शेणखताच्या ढिगाऱ्यापासून पसरतो कॉलरा
पावसाळ्याच्या दिवसांत लोकवस्तीजवळ असलेल्या शेणखताच्या ढिगाºयात पाणी साचल्याने कॉलरासारख्या आजाराची साथ पसरते. त्यामुळे शेणखताचे ढिगारे शक्यतो गावाबाहेर काढणे आवश्यक आहे. या सोबतच नदीकाठच्या नागरिकांनी साथरोगापासून बचाव करण्यासाठी दक्षता घ्यावी. पाणी गटारे साचू नये, यासाठी परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
या साथ रोगाची भीती
कीटक, हवा, दूषित पाणी, अन्नपदार्थ यामुळे एकाच वेळी एका भागातील अनेक लोकांना जो आजार होतो, त्याला साथीचा आजार, असे म्हणतात. सर्वसाधारणपणे पावसाळ्यात स्वाइन फ्लू, चिकनगुनिया, हिवताप, डायरिया, डेंगू, काविळ, कॉलरा अशा विविध आजारांची लागण होण्याची अधिक शक्यता आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत साथरोगाची लागण होऊ नये यासाठी पाणी नमुने, लिकेज दुरुस्ती, क्लोरीन, ब्लिचिंग पावडर व अन्य उपाययोजना करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना दिले आहेत. साथरोगाची लागण होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना केल्या आहेत.
- डॉ. मनीषा सूर्यवंशी, जिल्हा साथरोग अधिकारी