लाल दिवा अन् सहिष्णू पोटे!
By Admin | Published: November 18, 2015 12:17 AM2015-11-18T00:17:29+5:302015-11-18T00:17:29+5:30
मंत्रिमंडळाचे बहुप्रतीक्षित विस्तारीकरण अखेर हिवाळी अधिवेशनापूर्वी होणार आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच तसे जाहीर केल्यामुळे सत्तापक्षाच्या आमदारांमध्ये ऊर्जा संचारली आहे.
चर्चित चेहरे : रवी राणा, अनिल बोंडे, सुनील देशमुख
गणेश देशमुख अमरावती
मंत्रिमंडळाचे बहुप्रतीक्षित विस्तारीकरण अखेर हिवाळी अधिवेशनापूर्वी होणार आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच तसे जाहीर केल्यामुळे सत्तापक्षाच्या आमदारांमध्ये ऊर्जा संचारली आहे. प्रवीण पोटे, रणजित पाटील हेदेखील त्यानिमित्ताने चर्चेत आले आहेत.
प्रवीण पोटे यांनी जिंकलेली आमदारकी आणि त्यानंतर मिळविलेले राज्यमंत्रिपद ही इवल्याशा कालावधीतील गरुडझेपच! सामान्य व्यक्ती ते रियल इस्टेट- शैक्षणिक संस्था- आमदारकी ही पोटे यांच्या आयुष्यातील अनपेक्षित; पण तितकीच चमकदार वळणे. त्यांनी प्राप्त केलेले मंत्रिपद हे त्यांच्या राजकीय आयुष्यातील जसे सर्वाधिक यशस्वी वळण ठरले तसेच ते त्यांच्या चहुबाजूंनी राजकीय विरोधकांची फौज निर्माण करणारे समीकरणही ठरले. राजकारणात 'न्यू कमर' असलेल्या पोटे पाटलांच्या राज्यमंत्री-पालकमंत्रिपदाच्या हनुमान उडीने अनेक वर्षांपासून सावध राजकीय गुंतवणूक करीत असलेल्या नेतृत्वांना जबर धक्का बसला. पोटे नकोच, यासाठी भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर अनेकांनी वजन खर्ची घातले. मुळातच संघाच्या जडणघडणीत तयार झालेले नसल्यामुळे संघाचीही पोटेंना भक्कम साथ नव्हतीच. सुरुवातीला सर्वत्र असा अविश्वास असताना पोटे पाटील पुरून उरले.
तूर्तास तरी त्यांचे मंत्रिपद हिरावून घेता येणार नाही, याची खात्री पटल्यावर विरोधकांनी रणनीती बदलविली.
दिव्यांचा लखलखाट
प्रयत्न लाख झालेत, पण पोटे पाटलांच्या दिव्याला धक्का लागलेला नाही. मुख्यमंत्र्यांचा पोटे यांच्या कार्यप्रणालीवर असलेल्या विश्वासाचीच ती पावती होय. मंत्रिमंडळ फेरबदलात पोटे पाटलांच्या दिव्यावर गंडांतर येणार की कसे, अशी चर्चा जोर धरू लागली असली तरी त्यांचा दिवा कायम राहण्याचीच शक्यता अधिक आहे.
अमरावती जिल्ह््यात आणखी एक दिवा दिला गेल्यास नवल वाटू नये. अपक्ष आमदार रवी राणा, भाजपचे आमदारद्वय अनिल बोंडे आणि सुनील देशमुख ही नावे मंत्रिपदासाठी मुंबईस्तरावर चर्चेत आहेत. राणा आणि अमित शहा यांची दिल्लीतील भेटीची एक फेरी निपटली आहे. चंद्रकांत जाजोदिया हेदेखील बरेच धावपळीत आहेत.
अमरावतीच्या वाट्याला आणखी एक मंत्रिपद मिळाल्यास एकाच जिल्ह्यात दोन मंत्री असणार नाहीत. पक्षबांधणीची गरज असणाऱ्या जिल्ह्यात अमरावतीच्या मंत्र्याची मदत घेतली जाऊ शकेल. आमदार असलेले ज्येष्ठ नेता प्रकाश भारसाकळे यांचीही आठवण भाजपक्षाच्या वरिष्ठांना आहे.
अकोल्याचे रणजित पाटील यांचा कार्यकाळ संपत आला आहे. 'मुख्यमंत्र्यांच्या जवळ'चे असा त्यांच्यावर शिक्का असला तरी त्यांच्या पदनिश्चितीबाबत हजार चर्चा झडताहेत. रणजित पाटलांची दुहेरी परीक्षा आहे. मंत्रिपद टिकविणे आणि पुन्हा निवडून येणे, या दोन आघाडींवर त्यांना विजय संपादन करावा लागेल. पदवीधर मतदारसंघातूनच लढायचे झाल्यास त्यांना अमरावती जिल्ह्यातून मोठे हादरे बसू शकतील. मातब्बर राजकारणी असलेले संजय खोडके यावेळी मैदानात उतरणार आहेत. अनेकांना अनेक निवडणुका जिंकवून देणारे खोडके स्वत: रिंगणात उतरल्यास पाटलांना सर्वंकष कसब पणाला लावावे लागेल. पाटलांच्या मंत्रिपदाची निश्चिती करण्यासाठी मुंबईस्तरावर ही गणितेही चर्चिली जात आहेत. रिक्त होणाऱ्या विधानपरिषद जागेवर निवडून येणे हादेखील पर्याय ना. पाटील यांच्यासाठी विचाराधीन असू शकतो.