लाल शाळेच्या आगीला घातपाताची किनार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:43 AM2018-02-16T01:43:00+5:302018-02-16T01:43:27+5:30
नेहरू मैदान स्थित ९० वर्षे जुन्या लाल शाळेला लागलेली आगच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. महापालिकेच्या अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी यात घातपाताची शक्यता वर्तवित उच्चस्तरीय चौकशीची मागणी आयुक्तांकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नेहरू मैदान स्थित ९० वर्षे जुन्या लाल शाळेला लागलेली आगच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. महापालिकेच्या अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी यात घातपाताची शक्यता वर्तवित उच्चस्तरीय चौकशीची मागणी आयुक्तांकडे केली आहे. शहराच्या मध्यवस्तीतील या जागेवर बिल्डरांचा डोळा असल्याच्या पार्श्वभूमीवर घातपाताची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास नेहरू मैदान स्थित शाळा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील प्रयोगशाळेला अचानक आग लागली. यात हा हॉल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या संपूर्ण इमारतीची संरचना लाकडी आहे. त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते. मोठ्या हॉलची चार दारे, आठ खिडक्या, दोन लाकडी आलमाºया, तीन लोखंडी आलमाºया याशिवाय संपूर्ण लाकडाचे छत भस्मसात झाले. रसायनांच्या बॉटल फुटल्याने आग अधिकच तीव्र झाली. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन पथकाने आग विझविली. अंबानगरीचे वैभव असलेली ही इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. ही आग लावण्यात आल्याचा आरोप अनेकांनी केला.
महापालिकेच्या नावे 'प्रापर्टी कार्ड' असलेल्या या मालमत्तेवर अनेक बिल्डरांचा डोळा आहे. आग लावून ही इमारत धोकादायक ठरवायची. आम सभेतून त्यावर शिक्कामोर्तब करायचे आणि आमसभेच्या माध्यमातूनच तेथे व्यावसायिक संकुलाचा मार्ग प्रशस्त करावा, असा एकूण घाट असल्याचा आरोप होत आहे. या अनुषंगाने महापौर संजय नरवणे आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेता बबलू शेखावत आगीच्या घटनेची उच्चस्तरीय व सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
घातपाताचा संशय नाही, इमारत धोकादायकच
नेहरू मैदान स्थित शाळेची ही इमारत धोकादायक बनली आहे. बुधवारी सायंकाळी लागलेल्या आगीमागे घातपाताची शक्यता नाही, मात्र, स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त पवार यांनी दिली. तत्पूर्वी तेथील विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे. इमारतीची अवस्था पाहता, या परिसरात कोणीही जाऊ नये, असा फलक लावण्यात येईल. आग शॉर्ट सर्कीटने लागली असावी, अशी शक्यता आहे. मात्र, नेमक्या कारणांची चौकशी उपायुक्त, अग्निशमन अधीक्षक व शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सुरु करण्यात आल्याची माहिती आयुक्त हेमंत पवार यांनी दिली.
प्राथमिक अंदाज
शाळा इमारतीमधील वायरिंग जुनी झाली आहे. याखेरीज ज्या हॉलमध्ये आग लागली, तेथे प्रयोगशाळा होती. रात्रीच्या सुमारास एखाद्या रासायनिक द्रव्याची बॉटल खाली पडली असावी. याशिवाय ऐतिहासिक इमारतीची मागील बाजू निर्मनुष्य असते. रात्रीच्या वेळी तेथे असामाजिक तत्त्वांचा राबता असतो. अशा तीन शक्यता अग्निशमन अधीक्षक भारतसिंह चौहान यांनी व्यक्त केल्या.
आगीमुळे गुरुवारी विद्यार्थ्यांची शाळा नेहरू मैदानात भरविण्यात आली. या शाळेतील हिंदी बॉईजमध्ये १३०, गर्ल्स ११० व मराठी मुले १३७ शिक्षण घेत आहेत. येथे सहावी ते दहावीपर्यंत विद्यार्थी शिकायला आहेत.