रेड्डीला दोन दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:16 AM2021-04-30T04:16:36+5:302021-04-30T04:16:36+5:30
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, न्यायालयात हजर करण्यापूर्वीच कोरोना चाचणी परतवाडा / धारणी : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली ...
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, न्यायालयात हजर करण्यापूर्वीच कोरोना चाचणी
परतवाडा / धारणी : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी नागपूर येथून बुधवारी अटक करण्यात आलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या निलंबित एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी याला गुरुवारी दुपारी १ वाजता धारणी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात नेण्यापूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. एस. गाडे यांच्या न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
गुरुवारी पहाटे रेड्डी याला धारणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर चौकशी अधिकारी तथा एसडीपीओ पूनम पाटील व सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गीते यांनी चार तास चौकशी करून न्यायालयीन कागदपत्रे तयार केली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील, ठाणेदार विलास कुलकर्णी, प्रशांत गीते, पीएसआय देवेंद्र ठाकूर, मंगेश भोयर, सचिन होले, अरविंद सरोदे पोलीस कर्मचाऱ्यांनी रेड्डी याला तगड्या बंदोबस्तात गुरुवारी दुपारी धारणी न्यायालयात हजर केले. सरकारी बाजू बी. एम. भगत यांनी मांडली. त्यांच्यातर्फे सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. मात्र, दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
दोन्ही आरोपींना नागपूरहून अटक
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी विनोद शिवकुमार हा पळून जात असताना त्याला नागपूर रेल्वे स्टेशनहून २६ मार्च रोजी अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. बुधवारी श्रीनिवास रेड्डी यालाही नागपूर येथूनच अटक करण्यात आली.
बॉक्स
अन् रेड्डी थरथर कापले
आरोपी श्रीनिवास रेड्डीला पोलीस कोठडीतून पोलीस ठाण्याच्या आवारातील एका खोलीत पोलिसांनी चौकशीकरिता नेले. पुढे काय होईल, या भीतीपोटी ते थरथर कापत होते.
कोरोना तपासणीनंतरच न्यायालय कक्षात प्रवेश
आरोपी श्रीनिवास रेड्डी याला प्रथमत: न्यायालयात हजर केले. त्याची कोरोना तपासणी केली नसल्याने काही वेळानंतर पुन्हा बाहेर काढण्यात आले व कोरोना तपासणीकरिता धारणीतील कोविड केअर सेंटरवर नेऊन तेथे त्याची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यानंतर पुन्हा पोलिसांनी न्यायालयात हजर केले.
सहआरोपी
तपास अधिकारी पूनम पाटील यांनी शिवकुमार व मृत वनाधिकारी दीपाली चव्हाण यांचे घर व कार्यालयातून तपासकामी जप्त केलेली कागदपत्रे व लॅपटॉप मोबाईल यावरून सतत चौकशी सुरूच ठेवली होती. चौकशीवरून मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने मुख्य आरोपी विनोद शिवकुमार बाला याचेविरुद्ध भादंविचे कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्याच गुन्ह्यात कलम ३१२, ५०४, ५०६ या कलम ४ एप्रिल रोजी वाढ करून श्रीनिवास रेड्डीला आरोपी करण्यात आले आहे.