पोलिसांच्या नजरकैदेत होते रेड्डी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:16 AM2021-04-30T04:16:31+5:302021-04-30T04:16:31+5:30
परतवाडा (अमरावती) : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात सहा आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या ...
परतवाडा (अमरावती) : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात सहा आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी याला बुधवारी सायंकाळी ७:३० वाजता अमरावती येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. गुरुवारी पहाटे ४:३० वाजता धारणी येथे पोहोचून त्याला हवालातमध्ये टाकले. त्यानंतर त्याला तेथेच अंथरूण-पांघरूण देण्यात आले. विनोद शिवकुमारच्या अटकेपासूनच नागपूरपर्यंत ते पोलिसांच्या नजरकैदेत असल्याची माहिती आहे.
बॉक्स
मंत्रालयातून परवानगी
राज्यातील विविध संघटना व माध्यमे, समाजबांधवांनी श्रीनिवास रेड्डी याच्या अटकेची मागणी लावून धरली होती. रेड्डीने अटकपूर्व अंतरिम जामिनासाठी अचलपूर न्यायालयात अर्ज दाखल केला होता, न्यायालयाने तो फेटाळून गंभीर दखल घेतली होती. रेड्डी पळून गेला, तर अटक करायला अडचणी येतील हे पाहता मंत्रालयातून त्याच्या अटकेची परवानगी घेण्यात आली होती. तर त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नागपूर ते धारणी प्रवास
गिट्टीखदान पोलीस स्टेशनला रेड्डीला ताब्यात घेतल्याची नोंद घेण्यात आली. अमरावती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी यांच्या नेतृत्वात रवी बावणे, चेतन दुबे, पंकज हे बुधवारी २:३० वाजता नागपूरसाठी रवाना झाले. सायंकाळी ७:३० वाजता लोकेशन घेऊन हे पथक नागपूर येथील वनविभागाच्या शासकीय वसाहत सेमिनार हिल्स प्लॉट नंबर ए १ /६०८ तेथे पोहोचले. तेथे दोन मुले व पत्नी यांच्यासह श्रीनिवास रेड्डी घरात हजर होते. मुलगा निहाल याला चौकशीसाठी नेत असल्याची माहिती देऊन पोलिसांचे हे पथक रात्री ८:३० वाजता अमरावतीसाठी निघाले. त्यानंतर रात्री १२:३० वाजता अमरावती पोहोचले. तेथे एसडीपीओ ऑफिसला काही वेळ थांबून थेट हे पथक धारणी पहाटे ४:३० ला पोहोचले.
बॉक्स
वैद्यकीय तपासणी करून हवालात
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात सहआरोपी असलेला मार्तंला श्रीनिवास रेड्डी एम. रामसुप्पा रेड्डी यांची धारणी येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनच्या डायरीत नोंद करून हवालातमध्ये टाकले. हवालातीबाहेर पोलीस कर्मचाऱ्यांचा खडा पहारा लावण्यात आला. रेड्डींनी वकीलाला पहाटे फोन देखील केला. मात्र, त्यांच्या वकिलांनी फोन उचलला नाही.