रेड्डींना आज न्यायालयासमोर हजर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:12 AM2021-05-01T04:12:16+5:302021-05-01T04:12:16+5:30
परतवाडा : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात गुरुवारी पहाटे अटक केलेल्या निलंबित आरोपी एपीसीसीएफ श्रीनिवास यांना शनिवारी धारणी येथील न्यायालयात ...
परतवाडा : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात गुरुवारी पहाटे अटक केलेल्या निलंबित आरोपी एपीसीसीएफ श्रीनिवास यांना शनिवारी धारणी येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शनिवारी त्यांच्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपणार आहे.
हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात सहआरोपी असलेले श्रीनिवास रेड्डी यांना नागपूर येथे बुधवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. धारणी पोलीस ठाण्यात आणून गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली. दुपारी १ वाजता धारणी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शनिवारी न्यायालयात हजर केल्यावर पुन्हा पोलिसांकडून पीसीआर मागण्याची शक्यता आहे. त्यांना पीसीआर की, एमसीआर हे शनिवारी दुपारी स्पष्ट होईल. दरम्यान, गुरुवारी वडिलांची भेट घेण्यासाठी रेड्डी यांचा मुलगा धारणी येथे पोहोचला. त्याने काही कपडे सोबत आणले होते. मात्र आणलेल्या कापडांपैकी पोलिसांकडून फक्त बरमुडाच रेड्डी यांना घालण्यासाठी देण्यात आला.
बॉक्स
इच्छा व्यक्त केल्यास ध्वजारोहणास उपस्थितीची परवानगी
पोलीस ठाण्यातील कोठडीत असलेल्या आरोपीला ध्वजारोहणासाठी बाहेर काढावे, असा कुठलाच आदेश वजा शासनाचे परिपत्रक नाही. परंतु इच्छा व्यक्त केल्यास पोलीस अधिकारी राष्ट्रगीत व ध्वजारोहणासाठी आरोपीला बाहेर काढू शकतात, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यामुळे श्रीनिवास रेड्डी पोलीस कोठडीतून सलामी देतात की बाहेरून हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.