अर्भक मृत्यूदर कमी करण्यासाठी १० लाखांचा निधी, अॅम्ब्युलन्समधील साहित्याची खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 07:18 PM2017-11-13T19:18:18+5:302017-11-13T19:18:45+5:30
१०८ अॅम्ब्युलन्सला लागणारे साहित्य खरेदीकरिता १० लाखांची निविदा प्रक्रिया करण्यास शासनाने ९ नोव्हेंबर रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
अमरावती : 13व्या वित्त आयोगातून अर्भक मृत्यू दर कमी करण्यासाठी मंजूर अनुदानाच्या विनियोगासाठी नवीन कृती आराखड्यानुसार १०८ अॅम्ब्युलन्सला लागणारे साहित्य खरेदीकरिता १० लाखांची निविदा प्रक्रिया करण्यास शासनाने ९ नोव्हेंबर रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे. यातून अर्भक दर कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
राज्यातील अतिजोखमीच्या अहेरी, धारणी, चिखलदारा, पेठ व धडगाव या पाच तालुक्यांतील १०८ नंबरच्या प्रति तालुका दोन '१०८' अॅम्ब्युलन्स अपग्रेड करण्यासाठी बॅटरी आॅपरेटेड ट्रान्सपोर्ट, वॉर्मर, पल्स आॅक्सिमीटर, सीपॅप व कंज्युमेबल्स बाबींची खरेदी करण्यासाठी १० लाख रुपयांची प्रक्रिया करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आदिवासी भागातील बालमृत्यू कमी करण्यासाठी त्वरित संदर्भसेवा उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आदिवासी भागातील भौगोलिक कार्यक्षेत्र विचारात घेता संदर्भ सेवा संस्थांपर्यंत पोहचण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे आठ ते दहा टक्के मृत्यू प्रवासादरम्यान होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले असून हे मृत्यू टाळण्याकरिता राज्यातील अती जोखमीच्या पाच तालुक्यातील १०८ नंबरच्या प्रतीतालुका दोन अॅम्ब्युलन्समध्ये साहित्य लागते. ते खरेदी करणे अत्यंत आवश्यक असून त्याकरिता प्रशासकीय मान्यता मिळणे गरजेचे झाले आहेत.