संदर्भ सेवा रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 11:10 PM2017-12-01T23:10:08+5:302017-12-01T23:10:37+5:30
येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) किडनी प्रत्यारोपण केंद्र कार्यान्वित करण्यात आले.
लोकमत आॅनलाईन
अमरावती : येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) किडनी प्रत्यारोपण केंद्र कार्यान्वित करण्यात आले. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पुढाकाराने या केंद्रात लोकसहभागातून वातानुकूलन यंत्रणा व अद्ययावत खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शुक्रवारी या केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाला आरोग्य उपसंचालक नितीन अंबाडेकर, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, डॉ. जामठे यांच्यासह आरोग्यसेवेतील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या केंद्रामुळे अमरावती जिल्ह्यातील रुग्णांना मोठ्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही. शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य अभियानातून गरजू रुग्णांना विनामूल्य उपचार मिळणार आहेत. विविध सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग मिळाल्यानेच हे सुसज्ज केंद्र रुग्णांच्या सेवेत कार्यरत होऊ शकले, असे ते म्हणाले. मौखिक आरोग्य तपासणी अभियानाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी पार पडला. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ३० वर्षांवरील मौखिक आरोग्य तपासणी अभियान राज्यभर राबवले जात आहे. तरुणांनी व्यसनांना बळी पडू नये तसेच नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी प्रत्येक गावात हा कार्यक्रम राबवावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
इर्विन एआरटी केंद्रात टोकन पद्धतीचा शुभारंभ
जिल्हा रुग्णालयातील एआरटी केंद्रातील टोकन पद्धतीमुळे रुग्णांची माहिती गोपनीय राखण्याच्या हक्काचे जतन होणार आहे. जिल्हा रुग्णालयात एचआयव्ही बाधितांसाठीच्या अॅन्टी रेट्रो व्हायरल थेरपी (एआरटी) केंद्रात टोकन सिस्टीमचा व दंतरोग उपचार केंद्राच्या मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभही करण्यात आला. रुग्णांची गोपनीयता कायम राहावी म्हणून थेट नावाचा पुकारा न करता टोकन पद्धत अंमलात आणण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.