लग्नापूर्वीच शरीरसंबंध ठेऊन ऐनवेळी लग्नास नकार !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 11:07 AM2024-11-26T11:07:29+5:302024-11-26T11:08:25+5:30
Amravati : 'बीएनएस'च्या कलम ६९ अंतर्गत जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, अशी बतावणी करून लग्नसंबंध जोडण्यास आलेल्या कथित उपवराने त्या मुलीला हॉटेलमध्ये नेऊन तिच्यासोबत शारीरिक बळजबरी केली. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:३० ते दोनच्या सुमारास धामणगाव रेल्वे तालुक्यातील दत्तापूर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी, दत्तापूर पोलिसांनी आरोपी समरजितसिंग (३५, रा. इंदूर, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध २४ नोव्हेंबर रोजी 'बीएनएस'च्या कलम ६९ नुसार गुन्हा दाखल केला. १ जुलै रोजी संपूर्ण देशभरात नवीन फौजदारी कायदे अमलात आल्यानंतर 'बीएनएस'च्या कलम ६९ प्रमाणे नोंदविलेला हा जिल्ह्यातील पहिला गुन्हा ठरला आहे.
यातील फिर्यादी पीडिता ही २७ वर्षांची आहे. फिर्यादी व आरोपीच्या नातेवाइकांनी दोघांचेही लग्नसंबंध जोडण्याकरिता समाजाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आरोपी व फिर्यादीचा बायोडाटा स्वतंत्ररीत्या टाकला होता. ते दोन्ही बायोडाटा पाहिल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांचे फोन कॉलवरून लग्नाबाबत बोलणे झाले. त्यानंतर आरोपी समरजितसिंग व त्याचे नातेवाईक हे फिर्यादी मुलीच्या घरी धामणगाव रेल्वे तालुक्यातील त्या मुलीला पाहण्यासाठी आले. पाहणी झाल्यानंतर आरोपीने मला मुलीशी एकट्यात वेगळे बोलायचे आहे, असे म्हणून तो तिला दत्तापूर पोलिस ठाण्याच्या परिसरातील एका हॉटेलच्या रूममध्ये घेऊन गेला. तेथे त्याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यावर नकार देत थांबा, आता आपले लग्नच होणार आहे, असे मुलीने त्याला सुनावले. त्या नकाराकडे डोळेझाक करत व काही होत नाही, असे म्हणून आरोपीने आपल्याशी जबरदस्तीने एकदा शारीरिक संबंध ठेवल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर तरुणीचे काका यांनी लग्नाची तारीख काढण्याकरिता फोन केला असता आरोपीच्या नातेवाइकांनी मेसेज करून लग्नास नकार दिला. पुढे तरुणीने दत्तापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
कायद्याचे कलम ६९ काय म्हणते?
भारतीय न्यायिक संहितेचे (बीएनएस) कलम ६९ हे फसवणूक करून किंवा खोटी आश्वासने देऊन लैंगिक संबंध ठेवण्याबाबत आहे. या कलमात असे म्हटले आहे की, जो कोणी एखाद्या महिलेला फसवून किंवा लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवतो आणि प्रत्यक्षात तिच्याशी लग्न करण्याचा कोणताही हेतू नसतो, त्याला दहा वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते आणि दंडही होऊ शकतो. हे बलात्काराच्या श्रेणीत येत नाही. याचा उल्लेख भारतीय न्यायिक संहितेच्या कलम ६९ मध्ये आहे.