दुर्गास्थापना न करता फलक लावून नगरसेवकांचा निषेध
By admin | Published: October 3, 2016 12:13 AM2016-10-03T00:13:58+5:302016-10-03T00:13:58+5:30
जुन्यावस्तीच्या कंपासपुऱ्यात २ वर्षांपासून रखडलेल्या कामाचा या परिसरातील नागरिकांनी नवरात्र महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मैदानात नगरसेवकांच्या नावे निषेध फलक लावून रोष व्यक्त केला.
रखडलेले काँक्रिटीकरण : नगरसेवकांमध्येच हमरी-तुमरी
बडनेरा : जुन्यावस्तीच्या कंपासपुऱ्यात २ वर्षांपासून रखडलेल्या कामाचा या परिसरातील नागरिकांनी नवरात्र महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मैदानात नगरसेवकांच्या नावे निषेध फलक लावून रोष व्यक्त केला. या ठिकाणी दोनही नगरसेवकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या.
कंपासपुऱ्यातील हनुमान मंदिराजवळ मैदानासह रस्त्यावर आमदार निधीतून पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले. हे काम दोन वर्षांपूर्वी करण्यात आले. ज्या ठिकाणी पेव्हींग ब्लॉक बसविले तो जुन्यावस्तीचा मुख्य मार्ग आहे. पेव्हींग ब्लॉक गुळगुळीत असल्यामुळे येथे अपघात होतात. काहींना गंभीर इजा झाल्यात. यामुळे नागरिकांसह इतरही वाहनचालकांनी मैदानातील पेव्हींग ब्लॉक काढण्याची मागणी रेटून धरली. जुन्यावस्तीत या मैदानातून जावे लागते. तेव्हा आमदारांसह नगरसेवकांनी येथे काँक्रीटीकरण करू, असे आश्वासन दिले होते. मात्र दोन वर्षे होऊनही काम झाले नसल्याचे पाहून अंबाई नवरात्र महोत्सव समिती व कंपासपुऱ्यातील नागरिकांनी नगरसेवकांचा निषेध नोंदविला. या मैदानात नवरात्रीचा गरबा, भागवत, प्रवचने, नरकासूर दहन आदी मुख्य कार्यक्रम होतात. फलक ज्या ठिकाणी लावले तेथे नगरसेवक आले होते. त्याच्यातच आरोप प्रत्यारोप झालेत.
हनुमान मंदिराजवळच्या मैदानावर काँक्रिटीकरण करण्यासाठी वॉर्ड विकास निधीतून माझे प्रयत्न सुरू आहे. नवरात्री महोत्सव आटोपल्यावर प्रत्यक्ष त्या कामाला सुरुवात करू. कामाची मंजुरी मिळाली आहे.
- जयश्री मोरे,
नगरसेविका, बडनेरा
येथे काँक्रीटीकरण व सौंदर्यीकरण व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. शहर अभियंत्यांनी त्याची नोटशिट तयार केली. त्याचे दस्तऐवज संबंधित विभागाकडे गेले तेथून ते गहाळ झाल्याचे सांगितले जात आहे. लवकरच काम करू.
- विजय नागपुरे, नगरसेवक