‘अड्डा२७’ची नोंदणीही रद्द
By admin | Published: May 13, 2017 12:02 AM2017-05-13T00:02:17+5:302017-05-13T00:02:17+5:30
सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेल्या नोंदणी प्रमाणपत्राचा परवाना म्हणून गैरवापर केल्याचा ठपका ठेवत...
अवैध व्यवसायाचा ठपका : सहायक कामगार आयुक्त कार्यालयाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेल्या नोंदणी प्रमाणपत्राचा परवाना म्हणून गैरवापर केल्याचा ठपका ठेवत शहरातील दोन हुक्का पार्लर्सचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून ‘अड्डा २७’ आणि विद्यापीठ मार्गावरील ‘कसबा’ या दोन हुक्का पार्लरवर ही कारवाई करण्यात आली. शुक्रवारी दुपारी याबाबतचे आदेश पारित करण्यात आले.
‘सुसंस्कृत शहरात असंस्कृत व्यवसाय’ या मालिकेतून ‘लोकमत’ने हुक्का पार्लर्सच्या बेकायदेशीर व्यवसायावर प्रकाशझोत टाकला होता. त्या अनुषंगाने सहाय्यक कामगार आयुक्तांनी तातडीने दोन्ही हुक्का पार्लर्सचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केलेत. महाराष्ट्र दुकाने व संस्था अधिनियम १९४८ या कायद्यांतर्गत दुकाने, व्यापारी संस्था, हॉटेल, कर्मनुकीचे साधने इत्यादी व्यवसाय सुरू झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत आस्थापना मालकाने विहित नमुन्यातील फार्म व शुल्क आॅनलाईन भरल्यास त्या कागदपत्राची तपासणी केली जाते व तपासणीत योग्य ठरल्यास त्या आस्थापनेची सहायक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी केली जाते.
आॅनलाईनमुळे घोळ
अमरावती : त्यांना नोंदणी दाखला दिल्या जातो, असे सहाय्यक कामगार आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
हे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आवश्यक त्या दस्ताऐवजांची पुर्तता करणे हे संबंधित व्यवसायिकाची जबाबदारी असते. नोंदणी करताना संबंधित व्यवसायाचे नाव, पत्ता, मालकाचे संमती पत्र, महापालिकेची टॅक्स पावती, दोन फोटो व ओळखपत्र अशा सर्व दस्ताऐवजांची पूर्तता करून आॅनलाईन अर्ज सादर केला जाते. या आॅनलाईन अर्जावरून सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील दुकाने निरीक्षक दस्ताऐवजाची शहानिशा करतात आणि सर्व बाबी पडताळून पाहिल्यानंतर संबंधित व्यवसायिकांना नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते. ‘अड्डा २७’च्या संचालकांनीे या दस्ताऐवजांची पूर्तता केल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र मिळविले. मात्र, "टोबॅको स्मोकिंग झोन" च्या नावाखाली हुक्का पार्लर व डॉन्स सारखे प्रकार ‘अड्डा २७’च्या संचालकांनी चालविल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार नोंदणीकरतेवेळी दुकाने निरीक्षकांच्या निदर्शनास आला नसल्याने चुकीने अड्डा-२७ च्या संचालकांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले, अशी माहिती सरकारी कामगार अधिकारी डी.बी. जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. नोंदणीत दिलेल्या व्यवसायानुसार अड्डा-२७ मध्ये व्यवसाय सुरु नसल्याचे आढळून आल्याने ती नोंंदणी रद्द करण्यात आली आहे.
पूर्वी हस्तलिखित नोंदणी प्रमाणपत्र दिले जायचे. व्यवसाय सुरु करणारे सहायक कामगार आयुक्त कार्यालयातून अर्ज घेत होते. सर्व दस्ताऐवजांची पूर्तता झाल्यानंतर दुकाने निरीक्षक संबंधित प्रतिष्ठानाच्या ठिकाणी जाऊन स्थळ पाहणी करायचे व त्या अहवालाच्या आधारे नोंदणी प्रमाणपत्र दिले जात होते. तथापि आता या संबंधीचे अर्ज व दस्ताऐवज आॅनलाईन सादर करण्यात येत असल्याने स्थळ निरीक्षण केल्या जात नाही. आॅनलाईन माहितीच्या आधारेच व्यावसायिकांना नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळेच हा घोळ झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आॅनलाईन अर्जाच्या माध्यमातून हुक्का पार्लरला नोंदणी दाखला देण्यात आला. नोंदणी दाखला म्हणजे व्यावसायासाठी दिलेला परवाना नाही. आम्ही अशा हुक्का पार्लरला अवैध पद्धतीने व्यवसाय करण्याची परवानगी दिलेली नाही.
- रा.भा.आडे, सहायक कामगार आयुक्त, अमरावती