१९८१ टंचाईग्रस्त गावातील कृषी कर्जाचे होणार पुनर्गठन
By admin | Published: January 25, 2015 11:07 PM2015-01-25T23:07:06+5:302015-01-25T23:07:06+5:30
अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असल्याचे आढळून आलेल्या १९८१ टंचाईसदृश गावांमधील पीक कर्जाचे दीर्घ मुदतीत रुपांतर करण्याचे
अमरावती : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असल्याचे आढळून आलेल्या १९८१ टंचाईसदृश गावांमधील पीक कर्जाचे दीर्घ मुदतीत रुपांतर करण्याचे आदेश राज्याच्या सहकार विभागाने जारी केले आहे. थकीत पीक कर्जाच्या वसुलीला या आदेशामुळे स्थगिती देण्यात आली आहे.
जिल्ह्यात दुष्काळाच्या छायेमुळे खरीप व रबी हंगाम अपुऱ्या पर्जन्यमानामुळे पूर्ण बाधित झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकत्याच जाहीर झालेल्या खरीप हंगामात जिल्ह्यात १९८१ गावांमधील पिकांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांनी लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल होणार नाही, अशी परिस्थिती आहे. यामुळे हंगामासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने आठ प्रकारच्या उपाययोजनांमध्ये सूट दिली आहे. यात सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्ज वसुली स्थगिती आदींचा समावेश आहे. यासंदर्भात आदेश जारी झाला असून भीषण संकटातही शेतकऱ्यांना बँकांचा कर्जपुरवठा होत नाही. त्यामुळे कर्जवसुलीच्या तगाद्याला सामोरे जावे लागते. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थोडा का होईना मात्र दिलासा मिळणार आहे, हे निश्चित. याचा लाभ जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमधील बहुतांश शेतकऱ्यांना होणार आहे. (प्रतिनिधी)