पूरग्रस्त भापकीचे पुनर्वसन रखडलेलेच!

By admin | Published: January 17, 2015 10:51 PM2015-01-17T22:51:24+5:302015-01-17T22:51:24+5:30

अमरावती-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील वर्धा नदीच्या ऐलतीरावर वसलेले वरुड तालुक्यातील भापकी हे ५०० लोकवस्तीचे आणि ३०० मतदारांचे खेडेगाव आहे. हे गाव १९८२ मध्ये धरणग्रस्त झाले

Rehabilitation of flood affected people! | पूरग्रस्त भापकीचे पुनर्वसन रखडलेलेच!

पूरग्रस्त भापकीचे पुनर्वसन रखडलेलेच!

Next

संजय खासबागे - वरुड
अमरावती-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील वर्धा नदीच्या ऐलतीरावर वसलेले वरुड तालुक्यातील भापकी हे ५०० लोकवस्तीचे आणि ३०० मतदारांचे खेडेगाव आहे. हे गाव १९८२ मध्ये धरणग्रस्त झाले तर १९९१ मध्ये पूरग्रस्त. यामुळे हे गाव धरणग्रस्त की पूरग्रस्त, हा प्रश्न होता. त्यानंतर या गावाचा समावेश पूरग्रस्तांमध्ये करण्यात आला. परंतु अद्यापही या गावाचे यथायोग्य पुनर्वसन मात्र झालेले नाही.
लोणी रस्त्यावर या गावाचे पुनर्वसन करण्यात आले. याठिकाणी ग्रामपंचायत, शाळा, सार्वजनिक शौैचालये, नाल्या, रस्ते बांधले. मात्र, आवश्यक सोयी अद्यापही उपलब्ध झालेल्या नाहीत. भापकीवासीयांना त्यांच्या अधिग्रहित जागेचा मोबदला अजूनही मिळालेला नाही. २१ वर्षांपासून येथील ग्रामस्थ केवळ आश्वासनांवर जगत आहेत.
वर्धा नदीच्या काठावरील या गावाला ३०० वर्षांची परंपरा आहे. पूरग्रस्त होण्यापूर्वीच या गावात एसटी पोहोचली होती. यामुळे दळणवळण नियमित सुरु होते. १९८२ मध्ये अप्परवर्धा धरणाची मुहूर्तमेढ रोवल्यापासून गावापुढे पुनर्वसनाचा प्रश्न उभा ठाकला. तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे १९८४ मध्ये अर्ध्या गावाचे पूर्वीच्या गावालगत पुनर्वसन करण्यात आले. तालुक्यातील अनेक गावांना ३१ जुलै १९९१ च्या महापुराचा जबर फटका बसला. त्यामुळे या समृध्द अशा गावाचे वैभव लयाला गेले. यामुळे या गावाचा समावेश पूरग्रस्तांमध्ये झाला. त्यानंतर तालुक्यातील लहानमोठया गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, भापकी अपवाद ठरले. आज ना उद्या पुनर्वसन होईल, अशी प्रतीक्षा गावकऱ्यांना आजही लागलेली आहे.
गावाची लोकसंख्या ५०० च्या घरात असली तरी २७५ मतदार मतदानाचा हक्क बजावतात. विशेष म्हणजे भापकी येथे गटग्रामपंचायत असून २१ वर्षांच्या काळात या गावाच्या विकासाकरिता एक छदामचाही निधी देण्यात आला नाही. येथील घरे पडकी आहेत. भिंती जीर्ण झालेल्या आहेत. येथे रस्ते, नाल्या नाहीत. गावात जाणाऱ्या पाणंद रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. बालकांकरिता एक अंगणवाडी असून सभोवताली गवत वाढलेले आहे. दोन शिक्षकी प्राथमिक शाळा असून इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची मुले शिक्षण घेतात.
२१ वर्षांचा वनवास भोगणारे हे तालुक्यातील एकमेव गाव आहे. दोन नेत्यांच्या वादात हे गाव पुनर्वसनापासून वंचित राहिल्याची खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली. घरांच्या बांधकामाकरिता मोबदला मिळालाच नसल्याने भापकीवासीयांनी पुनर्वसनाकडे पाठ फिरविली आहे. तर शासन दरबारी हा प्रस्ताव धूळखात असल्याचे सांगतात.
जुन्या गावात नागरिक वास्तव्य करीत असताना शासनाने निधी देणे बंद केल्याने अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पळसवाडा हे गाव पुनर्वसित झाले असतानासुध्दा तेथे घरकूल योजना देण्यात येते. मात्र, भापकीवासीयांना ३० वर्षांपासून घरकूल योजना मिळाली नाही, ही भापकीवासियांची शोकांतिका आहे.

Web Title: Rehabilitation of flood affected people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.