लढवय्या नेतृत्वाची पुन्हा सिद्धता!

By admin | Published: September 7, 2015 11:59 PM2015-09-07T23:59:40+5:302015-09-07T23:59:40+5:30

प्रतिष्ठेची ठरलेल्या तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या महिला आमदार यशोमती ठाकूर यांनी संपादन केलेल्या चमकदार यशामुळे ...

Reinforces the leadership of the warrior leadership! | लढवय्या नेतृत्वाची पुन्हा सिद्धता!

लढवय्या नेतृत्वाची पुन्हा सिद्धता!

Next

गणेश देशमुख अमरावती
प्रतिष्ठेची ठरलेल्या तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या महिला आमदार यशोमती ठाकूर यांनी संपादन केलेल्या चमकदार यशामुळे त्यांच्या लढवय्य नेतृत्त्वावर पुन्हा एकदा निर्विवाद शिक्कामोर्तब झाले.
तालुका पातळीवरील बाजार समिती निवडणुकीचे स्वरुप एरवी लहान असले तरी तिवस्यात मात्र ही निवडणूक दिग्गजांची होती. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर विरुद्ध भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, सीपीआय हे पक्ष एकवटले होते. प्रहार पक्षातून निष्कासित झालेले संजय देशमुख यांनी यशोमतींच्या पराजयासाठी जसे उत्साही प्रयत्न केलेत, यशोमतींचे जावई सत्यजित निंबाळकर हेही तसेच यशोमती विरोधकांचे ऊर्जास्त्रोत बनून तिवस्यात डेरेदाखल होते.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) बबलू देशमुख हे त्यांच्या अचलपूर या गृहतालुक्यातील निवडणुकीत व्यग्र होते. तथापि, यशोमतींना डावलण्याची कुठलीही संधी गमावणे त्यांच्या स्वयंसंहितेविरुद्ध असल्याने तिवसा तालुक्यात 'पंजा'वर 'बाण' मारून 'कमळ' फुलविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न त्यांनी केलेत.
एका महिला नेतृत्त्वाविरुद्ध स्वकीय-परकियांनी अशी अभेद्य राजकीय भिंत उभारल्यावर तिची मजबुती लोकमनांवर बिंबविण्यासाठी दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री तिवसा तालुक्यात प्रचाराला नेले गेले. त्या दोन्ही पालकमंत्र्यांचा प्रभाव किती, हा मुद्दा स्वतंत्रपणे चर्चिला जावा, असा असला तरी नामदारांच्या शासकीय, प्रशासकीय 'वजना'चा अन् लाल दिव्यांचा प्रभाव ग्रामीण मनांवर पाडण्यासाठीचाच तो सर्वोच्च प्रयत्न होता. बंजारा मते वळविण्यासाठी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड आणि मराठा मतांवर छाप पाडण्यासाठी अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांना तिवस्यातील निवडणुकीत प्रचाराचा आग्रह धरण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत पार पडलेल्या चार बाजार समिती निवडणुकांपैकी केवळ तिवसा या एकमेव तालुक्यात दोन पालकमंत्री प्रचारासाठी गेले. तथापि, यशोमतींची छबी या दोन्ही नामदारांच्या छबीपेक्षाही प्रभावी ठरली.
काँग्रेस पक्षाच्या धाटनीत नेतृत्वगुणांना मजबुती मिळाली असतानाही यशोमती ठाकूर या आक्रमक नेतृत्वासाठी ओळखल्या जातात. विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी, नेत्यांनी ठरवून त्यांच्याविरुद्ध एकी केली होती. भगवी लाट, विरोधकांची हातमिळवणी आणि रक्ताच्या नात्यांनी केलेला दगा या घटना अपयश खुणविणाऱ्याच होत्या. चित्र असे भेसूर असतानाही आत्मविश्वास ढळू न देता, आक्रमकतेला संयमाची जोड देऊन यशोमतींनी विरोधकांचा जो धुंव्वाधार सफाया केला. त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीतही बघायला मिळाली. विरोधाची कारणे द्यायला यशोमतींच्या विरोधकांना जसे त्यावेळी तोंड नव्हते, तसेच यावेळीही ते नाही!

Web Title: Reinforces the leadership of the warrior leadership!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.