दहा रुपयांचे नाणे नाकारले जातेय? कारण लिहून मागा; कायद्यात ३ वर्षे कारावासाची तरतूद
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 8, 2023 16:57 IST2023-05-08T16:57:03+5:302023-05-08T16:57:36+5:30
Amravati News दुकानदार किंवा ग्राहक यापैकी कोणीही दहा रुपयांचे नाणे घेण्यास नकार दिला तर त्यांना कारण लिहून मागा, कारण त्यासाठी कायद्यात तीन वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे.

दहा रुपयांचे नाणे नाकारले जातेय? कारण लिहून मागा; कायद्यात ३ वर्षे कारावासाची तरतूद
गजानन मोहोड
अमरावती: दहा रुपयांच्या नाण्यांमागे लागलेले अफवांचे सत्र थांबायला नावच घेत नाही. काही काळ जात नाही तोच पुन्हा हे नाणे बंद होणार असल्याची अफवा बाजारात आली. त्यामुळे काही दुकानदार नाणे स्वीकारत नाही तर काही त्यांच्याजवळ असलेले नाणे नोटेऐवजी देत आहे. दहा रुपयांचे नाणे वैध व चलनातच असल्याचे अग्रणी बँक व्यवस्थापकांनी सांगितले.
लगतच्या जिल्ह्यात ही अफवा पसरल्यावर याची लागण जिल्ह्यातही झाल्याचे दिसून येते. काही व्यापारी १० रुपयांचे नाणे घेत नसल्याचे महिला ग्राहकांनी सांगितले. याशिवाय किरकोळ विक्रेत्यांद्वारा रक्कम ग्राहकाला परत करतांना १० रुपयांच्या नोटेऐवजी त्यांच्याजवळील अधिकतम १० रुपयांची क्वॉईनच देत असल्याचा प्रकार अलीकडे वाढला आहे. घरातील पिग्मी बँकामधील १० ची नाणी बाहेर आली आहेत. या अफवेमुळे सर्वांनाच नाहक त्रास होत आहे.
बाजारात १० रुपयांचे नाणे त्यावरील वेगवेगळ्या १४ प्रकारच्या शिक्क्यासह चलनात आहेत, नाणे बंद झाल्याबाबत आरबीआयचे कुठलेही पत्र नाही. त्यामुळे बँकांनी त्यांच्या दर्शनी भागात याबाबतचा बोर्ड लावल्यास नागरिक व व्यावसायिकांमध्ये असलेला गैरसमज दूर होईल,असे मत नागरिकांनी व्यक्त केले.