नातेवाइकांनी दिला नकार महापालिकेकडून अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 05:00 AM2021-05-22T05:00:00+5:302021-05-22T05:00:36+5:30

अमरावतीच्या हाथीपुरा येथील ४ एप्रिल २०२० रोजी मुमताज नामक व्यक्ती कोरोनाने दगावली होती. कोरोनाने मृत्यू झाल्याची ही पहिलीच नोंद करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत कोरोनाने १,३०३ जणांचा बळी घेतला. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याची गाईड लाईन निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

Rejection given by relatives Funeral from Municipal Corporation | नातेवाइकांनी दिला नकार महापालिकेकडून अंत्यसंस्कार

नातेवाइकांनी दिला नकार महापालिकेकडून अंत्यसंस्कार

googlenewsNext
ठळक मुद्देसात कोरोना मृतदेहांची जबाबदारी, खर्चाचा भारदेखील उचलला

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना संसर्गाने गत १४ महिन्यांच्या कोरोनाकाळात अनेकांना चांगले-वाईट अनुभव दाखविले. मात्र, कोरोनाने दगावलेल्या व्यक्तींचे मृतदेह आप्तेष्टांनी स्वीकारले नसल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. नातेवाइकांनी नाकारलेल्या अशा कोरोनाच्या सात मृतदेहांवर महापालिकेने अंत्यसंस्कार करून कर्तव्यपरायणतेचा परिचय दिला आहे. 
अमरावतीच्या हाथीपुरा येथील ४ एप्रिल २०२० रोजी मुमताज नामक व्यक्ती कोरोनाने दगावली होती. कोरोनाने मृत्यू झाल्याची ही पहिलीच नोंद करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत कोरोनाने १,३०३ जणांचा बळी घेतला. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याची गाईड लाईन निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. रुग्णालय ते स्मशानभूमी दरम्यान ॲम्ब्युलन्समधून कोरोना मृतदेह नेण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केले आहेत. महापालिकेच्या नियंत्रणात विलासनगर, एसआरपीएफ कॅम्प व शंकरनगर येथील स्मशानभूमीत कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. हिंदू स्मशानभूमीत कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारांसाठी गॅस दाहिनी, सरणाची  व्यवस्था आहे. 
पीडीएमसी, सुपर स्पेशालिटी व जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनावर उपचार घेताना दगावलेल्या सात जणांच्या नातेवाइकांनी  परत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क केला नाही. पोलिसांकडून त्यांच्याशी संपर्क, संवाद साधण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यांनी दाद दिली नाही. अखेरीस महापालिकेने स्वत:ची यंत्रणा वापरून अशा सात मृतदेहांवर विधिवत अंत्यसंस्कार व दहन केल्याची माहिती प्रशासनाने दिली. 

स्मशानभूमीत १५० अस्थींना आप्तांची प्रतीक्षा
शहरातील हिंदू स्मशानभूमीत कोरोना वा नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जातात. येथे अंत्यसंस्कारानंतर अस्थी सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत १५० अस्थी लॉकर्समध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. अद्यापही नातेवाइकांनी त्या अस्थी नेल्या नाहीत, अशी माहिती हिंदू स्मशानभूमीचे प्रबंधक एकनाथ इंगळे यांनी ‘लोकमत’ला दिली. महापालिका प्रशासनाकडून प्राप्त पत्रानुसार बेवारस अथवा नातेवाइकांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला, अशा सात कोरोना मृतदेहांवर अंत्यविधी केल्याचे इंगळे यांनी सांगितले.

बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी निधी
बेवारस मृत्यू, अंत्यसंस्कारासाठी पैसे नाही अथवा नातेवाइकांनी मृतदेह नाकारल्यास महापालिका अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारते. त्याकरिता महापालिकेने अग्रीम निधी मंजूर केला आहे. बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे दायित्व महापालिकेने स्वीकारले आहे.

कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी नव्हे, तर हे कर्तव्य म्हणून महापालिका पार पाडत आहे. मृतदेहांसाठी ॲम्ब्युलन्स, वाहने उपलब्ध आहेत. दोन चालक, आठ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. आतापर्यत नातेवाइकांनी नाकारलेल्या सात कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 
- प्रशांत रोडे, 
आयु्क्त, महापालिका 

 

Web Title: Rejection given by relatives Funeral from Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.