नातेवाईकांचा नकार, महापालिकेकडून अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:12 AM2021-05-22T04:12:30+5:302021-05-22T04:12:30+5:30
अमरावती : मार्च २०२० पासून कोरोनाचे आगमन झाले आणि आजतागायत संसर्ग कायम आहे. गत १४ महिन्यांच्या कोरोना काळात अनेकांना ...
अमरावती : मार्च २०२० पासून कोरोनाचे आगमन झाले आणि आजतागायत संसर्ग कायम आहे. गत १४ महिन्यांच्या कोरोना काळात अनेकांना चांगले-वाईट अनुभवदेखील आलेत. मात्र, कोरोनाने दगावलेल्या व्यक्तींचे मृतदेह आप्तेष्टांनी स्वीकारले नसल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहे. नातेवाईंकांनी नाकारलेल्या कोरोनाच्या सात मृतदेहांवर महापालिका प्रशासनाने अंत्यसंस्कार करून मानवतेचा परिचय दिला आहे.
अमरावतीच्या हाथीपुरा येथील ४ एप्रिल २०२० रोजी मुमताज नामक व्यक्ती कोरोनाने दगावली होती. कोरोनाने मृत्यू झाल्याची ही पहिलीच नोंद करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत कोरोनाने १,३०३ जणांचा बळी घेतला आहे. यात शासकीय, खासगी कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य यंत्रणेने घेतली. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याची गाईडलाईन निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. रुग्णालय ते स्मशान भूमी दरम्यान ॲम्ब्यूलन्समधून कोरोना मृतदेह नेण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केले आहे. महापालिका नियंत्रणात विलासनगर, एसआरपीएफ कॅम्प व शंकरनगर येथील स्मशानभूमीत कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. हिंदू स्मशानभूमीत कोरोना मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी गॅस दाहिनी, सरणाची व्यवस्था आहे. पीडीएमसी, सुपर स्पेशालिटी व जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनावर उपचार घेण्यात येणाऱ्या सात बेवारस मृतदेहांवर यंदा महापालिका प्रशासनाने अंत्यसंस्कार केल्याची माहिती स्वच्छता विभागप्रमुख सीमा नैताम यांनी दिली.
---------------------
हिंदू स्मशान भूमीत १५० अस्थींना नातेवाईकांची प्रतीक्षा
येथील हिंदू स्मशानभूमीत कोरोना वा नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जातात. येथे अंत्यसंस्कारानंतर अस्थी सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकर्सची व्यवस्था करण्यात आली असून, आतापर्यंत १५० अस्थी लॉकर्समध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. अद्यापही नातेवाईकांनी अस्थी नेल्या नाहीत, अशी माहिती हिंदू स्मशान भूमीचे प्रबंधक एकनाथ इंगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. महापालिका प्रशासनाकडून प्राप्त पत्रानुसार बेवारस अथवा नातेवाईकानी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला अशा सात कोरोना मृतदेहांवर अंत्यविधी केल्याचे इंगळे यांनी सांगितले.
--------------
अंत्यस्कारासाठी असा लागतो खर्च
गॅस दाहिनी- १५०० रुपये
सरण (लाकूड)- २७०० रुपये
चार कर्मचाऱ्यांचे पीपीई किट- ६००० रुपये
----------------------
बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी अग्रीम निधी
बेवारस मृत्यू , नातेवाईंकांकडे अंत्यसंस्करासाठी पैसे नाही अथवा नातेवाईकांनी मृतदेह नाकारला अशा प्रसंगी महापालिका प्रशासन संबंधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्वीकारते. त्याकरिता महापालिकेने अग्रीम निधी मंजूर केला आहे. बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे उत्तरदायित्व महापालिकेने स्वीकारले आहे.
--------------------
नातेवाईंकांनी न स्वीकारलेले सात कोरोना मृतदेह
अंजनगाव सुर्जी येथील ५५ वर्षीय महिला
धारणी येथील ६३ वर्षीय पुरुष
वरूड येथील ४० वर्षीय पुरूष
राजापेठ मायानगर येथील ७५ वर्षीय महिला
निंबा, चांदूर बाजार येथील ६५ वर्षीय पुरूष
बडनेरा जुनीवस्ती येथील ६० वर्षीय महिला
अमरावती यशोदानगर येथील ६२ वर्षीय पुरूष
---------------------
कोट
कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी नव्हे तर हे कर्तव्य म्हणून महापालिका पार पाडत आहे. मृतदेहांसाठी ॲम्ब्युलन्स, वाहन उपलब्ध आहे, दोन चालक, आठ कर्मचारी नेमण्यात आले आहे. आतापर्यत नातेवाइकांनी नाकारलेल्या सात कोरोना मृतदेहांवर यंदा अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
- प्रशांत रोडे, आयु्क्त, महापालिका
०००००००००००००००००००००