दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाइकांना सीएम रिलीफ फंडातून मिळावी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 05:00 AM2021-09-16T05:00:00+5:302021-09-16T05:00:21+5:30
अपघाताच्या या घटनेमुळे संबंधितांच्या कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रसंगी आपण सर्व त्यांच्या समवेत उभे आहोत. या घटनेतील व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या तसेच सीएम रिलीफ फंडाच्या माध्यमातून नुकसान भरपाईपोटी तात्काळ मदत मिळावी, असे पालकमंत्र्यांनी निवेदनात नमूद केले. महाविकास आघाडी शासन आपद्ग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वरूड तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथील वर्धा नदीमध्ये बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व सीएम रिलीफ फंडाच्या माध्यमातून तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन केली.
अपघाताच्या या घटनेमुळे संबंधितांच्या कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रसंगी आपण सर्व त्यांच्या समवेत उभे आहोत. या घटनेतील व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या तसेच सीएम रिलीफ फंडाच्या माध्यमातून नुकसान भरपाईपोटी तात्काळ मदत मिळावी, असे पालकमंत्र्यांनी निवेदनात नमूद केले. महाविकास आघाडी शासन आपद्ग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना शासनाकडून निश्चितपणे मदत मिळवून दिली जाईल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त करीत आपद्ग्रस्तांच्या कुटुंबीयांना मदत मिळण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली. तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन व स्थानिक आमदार देवेंद्र भुयार यांच्याशी चर्चा केली. वर्धा नदीत बुडालेल्या उर्वरित व्यक्तींचा तातडीने शोध घ्या. आपतकालीन मदत लागल्यास हयगय करु नका, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले. संपूर्ण राज्यसरकार व जिल्हा प्रशासन या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या दु:खात सहभागी असल्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या.