लॉकडाऊनमध्ये शिथिलता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:08 AM2021-03-29T04:08:46+5:302021-03-29T04:08:46+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्यामुळे लॉकडाऊनच्या निकषात शिथिलता देण्यात आली आहे. आता सर्व दुकाने मॉल्स सकाळी ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्यामुळे लॉकडाऊनच्या निकषात शिथिलता देण्यात आली आहे. आता सर्व दुकाने मॉल्स सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत सुरू राहणार आहेत. तर हाॅटेल्स हे सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहतील. ३० एप्रिलपर्यंत हे आदेश लागू राहतील. तसे आदेश अप्पर जिल्हाधिकारी राम सिद्धभट्टी यांनी रविवारी सायंकाळी जारी केले आहे.
जिल्ह्यात रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली. आरोग्यसेवा व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व खासगी आस्थापना ५० टक्के उपस्थितीत सुरू राहतील. निर्मिती उद्योग हे पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक उपायांची अंमलबजावणी करावी लागेल. सर्व प्रकारची वाहतूक आवश्यक निर्बंधासह सुरू राहील. जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातील ट्रॅव्हल, खासगी बसेस, सर्व खासगी वाहतूक, एसटी बसेसची सेवा, महापालिका बसेसची सेवा व ऑटो वाहतुक संचारबंदी कालावधी व्यतिरिक्त सुरू राहील.
हॉटेल संचारबंदी कालावधीत बंद राहतील, तथापि या कालावधीत घरपोच सेवा देता येणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधीत ५० टक्के क्षमतेनेच सुरू करता येतील. नियमाचे उल्लंघन केल्यास २५ हजारांचा दंड व १० दिवसांसाठी हॉटेल सील करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवांतर्गत मजीप्रा, महावितरण, सिलिंडर पुरवठा रोड दुरुस्ती,नालेसफाईची कामे सुरू राहतील, असे आदेशात स्पष्ट केले आहे.
पाईंटर
सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व खेळ या कालावधीत राहणार बंद, सिनेमागृहात ५० टक्के क्षमतेनेच प्रवेश.
लग्न समारंभाला सकाळी ९ ते सायंकाळ ६ पर्यंतच परवानगी, वर-वधू,ऑर्केष्ट्रा, कॅटर्रस व बॅडपथकासह ५० जणांनाच परवानगी
अंत्यविधीकरिता २० लोकांनाच परवानगी, ही कार्यवाही स्थानिक प्राधिकरण करणार.
धार्मिक संस्थांमध्ये गर्दी होणार नाही याचे करावे लागणार नियोजन, फिजिकल डिस्टन्स महत्त्वाचे.
‘होम क्वारंटाईन’ रुग्णाच्या घरासमोर लागणार फलक, कालावधी राहणार नमूद