मुंबई, पुण्यातून ‘त्या’ मुलींची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:09 AM2021-07-04T04:09:26+5:302021-07-04T04:09:26+5:30
पथ्रोट : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या तक्रारी नुकत्याच दाखल झाल्या होत्या. जिल्हा ...
पथ्रोट : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या तक्रारी नुकत्याच दाखल झाल्या होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नियुक्त केलेल्या पथकाने आठ दिवसांच्या काळात मुंबई, पुणे येथील भ्रमणध्वनी लोकेशन मिळवून पळवून नेणाऱ्या दोघांसह दोन अल्पवयीन मुलीना ताब्यात घेतले. एका मुलीचा शोध सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, वाल्मीकपूर येथील अल्पवयीन मुलीला ५ मे २०२१ रोजी नितेश राजेंद्र वानखडे (रा. काकडा) याने फूस लावून पळवून नेले होते. पथ्रोट टाऊनमधील झेंडा चौक परिसरातील अल्पवयीन मुलीला शिंदीनजीकच्या गावातील मुलाने पळवून मुंबईला नेले होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नियुक्त केलेल्या पथकाने पहिल्या प्रकरणात मुंबईतील पवई आयआयटी पार्क, उल्हासनगर, कल्याण, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, डोंबीवली कांजुर मार्ग ते पुणे असा प्रवास करीत वाघोली येथील भ्रमणध्वनीच्या लोकेशनवरून सर्व औद्योगिक वसाहतींमधील भाडेकरी वस्तीत चौकशी करून आरोपींचा व फूस लावून पळवून नेलेल्या मुलींचा छडा लावला. बचाव पथकातील राजू जाधव, सुनंदा चव्हाण यांनी बसने पुणे गाठून त्यांना पथ्रोट ठाण्यात आणले. दुसर्या मुलीच्या शोधार्थ कोरेगाव व परिसर पिंजून काढल्यानंतर रांजणगाव येथून आरोपी सागर अरुण गाठे (रा. पोही) व अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले. तपास पथकात गोपनीय विभागातील जमादार हेमंत येरखडे, सचिन सालफळे, महिला पोलीस सुमेरी भिलावेकर यांचा समावेश होता.
पथकाने सलग चार ते पाच दिवस अथक परिश्रम घेऊन दोन मुलींसह आरोपींना ताब्यात घेतले व त्यांना पथोट पोलिसांना सोपविले. एकाच वेळी दोन हरविलेल्या मुलीचा तपास लावण्याची घटना जिल्हाभरातील प्रथमच असावी, असे सांगितले जात आहे. आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
परसापूर बीटचे जमदार विष्णू कहाणे, दीपक दलाल व पथ्रोट टाऊनचे बीट जमदार सुनील पवार, राहुल काळपांडे पुढील तपास करीत आहेत. पालकांच्या तक्रारींवरून गुन्हा दाखल केला आहे.
- सचिन जाधव, ठाणेदार, पथ्रोट पोलीस ठाणे