खबरे देतात ‘लाईन क्लिअर’ची सूचना

By Admin | Published: November 18, 2015 12:27 AM2015-11-18T00:27:40+5:302015-11-18T00:27:40+5:30

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे राज्य परिवहन महामंडळाचे ब्रिद वाक्य आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचून प्रवाशांची ने-आण करणाऱ्या ...

Releases 'Line Clear' Reports | खबरे देतात ‘लाईन क्लिअर’ची सूचना

खबरे देतात ‘लाईन क्लिअर’ची सूचना

googlenewsNext

वरूड : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे राज्य परिवहन महामंडळाचे ब्रिद वाक्य आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचून प्रवाशांची ने-आण करणाऱ्या एसटी महामंडळाच्या गाड्या कितीही नफ्यात असल्या तरी वाहकांच्या खाबुगिरीमुळे त्या नेहमीच तोट्यात येत असल्याचे निदर्शनास येते. तिकीट तपासणी पथकाला झोकांडी देण्याकरिता खेडोपाडी चक्क खबऱ्यांचे जाळे पसरल्याचे दिसते. हे खबरे आधीच चालक-वाहकाला भ्रमणध्वनीवरून रस्ता ‘क्लिअर’ असल्याची सूचना देतात.
भ्रमणध्वनीच्या सुविधेमुळे तिकीट तपासणीसांचे फिरते पथक कुठे आहे, याचा छडा सेकंदात लागत असल्याने वाहक त्या मार्गाने जाताना तिकिटांच्या रकमेचा किती अपहार करायचा, हे ठरवतात. इतकेच नव्हे तर मोर्शीमध्ये एक खबऱ्या उभा राहून निरीक्षण पथकावर पाळत ठेवतो व त्यांच्या हालचालींची माहिती भ्रमणध्वनीवरून वाहकांना देतो. यासाठी या खबऱ्याला मानधनसुध्दा दिले जात असल्याची परिसरात खमंग चर्चा आहे. दररोज एकाच मार्गावरून ये-जा करणारा नोकरदार वर्ग ‘अडजेस्टमेंट’वर प्रवास करीत असल्याचे चित्र असून यामुळे वाहकांची जरी चांदी होत असली तरी एसटीचे उत्पन्न मात्र बुडत आहे.
परप्रांतात जाणाऱ्या एसटीच्या वाहकांना तर पैसे कमविण्याची सुवर्णसंधीच मिळते. परप्रांतात जाणाऱ्या बसफेरीवर नियुक्ती करण्यासाठी सुध्दा वाहकांना वरिष्ठ पातळीवर दिलजमाई करावी लागत असल्याचे सांगितलेजाते. राज्याची सीमा ओलांडताच तिकीट न देता प्रवाशांकडून मिळणारी रक्कम थेट वाहकांच्या खिशात जाते. या रकमेचा कोणताही हिशेब नसतो. अमरावती भोपाळ, छिंदवाडा या बसफेऱ्या म्हणजे कुबेराची खाण असल्याचे चित्र आहे. याबसवर आपली नियुक्ती व्हावी, यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. मध्यप्रदेशात लाल डब्बा म्हणून प्रसिध्द असलेल्या अमरावती -भोपाळ या बसच्या सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन फेऱ्या होत्या. मात्र, वाहकांच्या खाबूगिरीमुळे अपेक्षेपेक्षा उत्पन्न कमी होत असल्याने रात्रीची फेरी बंद करण्यात आली. परप्रांतात जाणाऱ्या बसची कधीही तपासणी होत नाही. एखादवेळी झालीच तर अधिकाऱ्यांसोबत सूत जुळवून 'अ‍ॅडजेस्टमेंट'चे धोरण वापरले जाते.
इतकेच नव्हे, तर अमरावती- वरुड, वरुड-नागपूर, वरुड-वर्धा, अकोला, यवतमाळ जाणाऱ्या लांब पल्लयाच्या बसवरील वाहक आपल्या समोर जाणाऱ्या गाडीच्या वाहक मित्राला मोबाईलवरुन ‘मार्ग चेकर विरहीत आहे ना ’ अधिकाऱ्याची गाडी कोणत्या स्टॉपवर आहे, कोठून निघाली, याबाबत खडान्खडा माहिती घेत असतात. याकरिता मोर्शी, हिवरखेड, वाठोडा, जलालखेडा, लेहगांव अशा ठिकाणी खबरे नेमलेले असतात. ते सतत भ्रमणध्वनीवरुन तपासणी पथकाबाबत माहिती देत देतात. यामुळे एस.टी.महामंडळाच्या उत्पन्नात कमालीची घट होत आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीने एका वाहकासोबत चर्चा केली असता नाव न सांगण्याच्या अटीवर त्याने सांगितले की, तुटपुंजे वेतन असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी इच्छा नसतानासुध्दा हा मार्ग अवलंबावा लागतो. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Releases 'Line Clear' Reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.