रिलायन्सचे खोदकाम मंजुरीपेक्षा जास्त?

By admin | Published: April 26, 2015 12:16 AM2015-04-26T00:16:34+5:302015-04-26T00:16:34+5:30

४ जी इंटरनेट सुविधा पुरविण्यासाठी शहरात रिलायन्स कंपनीचे केबल टाकण्यासाठी भुयारी खोदकाम सुरु आहे.

Reliance excavation more than sanction? | रिलायन्सचे खोदकाम मंजुरीपेक्षा जास्त?

रिलायन्सचे खोदकाम मंजुरीपेक्षा जास्त?

Next

आयुक्तही अचंबित : न खोदलेल्या भागात निधी वाटप
अमरावती : ४ जी इंटरनेट सुविधा पुरविण्यासाठी शहरात रिलायन्स कंपनीचे केबल टाकण्यासाठी भुयारी खोदकाम सुरु आहे. रिलायन्सने महापालिकेतून ११६ कि.मी. लांब खोदकामाची परवानगी घेतली आहे. मात्र, मंजुरीपेक्षा जास्त खोदकाम होत असल्याची बाब पुढे आली असून याप्रकरणी सत्यता बाहेर आणण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे.
शहरातील प्रमुख रस्ते, सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते तसेच माती खोदकाम असे एकूण ११६ कि. मी. लांबीचे भुयारी खोदकाम करण्याची परवानगी महापालिकेने दिली आहे. केबल टाकण्याची परवानगी ही राज्य शासनाने यापूर्वीच दिली असून केवळ शहरात खोदकाम करायचे असल्याने महापालिकेची मान्यता आवश्यक होती. त्यानुसार प्रशासनाने शासन निर्णयाचा आधार घेत केबल टाकण्यासाठी भुयारी खोदकामाची परवानगी देण्याचा विषय सभागृहासमोर मांडला. तेव्हा सुरुवातीला रिलायन्स कंपनीही आठ कोटी रुपयेच द्यायला तयार होती. परंतु अकोला महापालिकेने कमी खोदकाम असताना जास्त रक्कम आकारल्याची कुणकुण येथील सदस्यांना लागताच भुयारी खोदकामाच्या रक्कम आकारणीवरुन चांगलेच वादळ उठले. सदस्यांनी शासन निर्णय, अहवाल सभागृहात सुस्पष्ट ठेवण्याचे निर्देश दिले होते. तेव्हा प्रशासनाने नव्याने रिलायन्सच्या भुयारी खोदकामाची सविस्तर माहिती सभागृहात सादर केली. खोदकाम किती, शहरातील मार्ग याची माहिती दिल्यानंतर सविस्तर चर्चेअंती खोदकाम परवानगीपूर्वी रक्कम वाढविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार रिलायन्स कंपनीला ११६ कि.मी. लांबीच्या खोदकामासाठी २२ कोटी, ११ लाख. २५ हजार, ३५९ रुपये भरण्यास भाग पाडले. एवढेच नव्हे तर ३ कोटी, ४ लाख, ४० हजार रुपये बँक गँरटी घेण्यात आली आहे. मात्र, रिलायन्सने खोदकामाची परवानगी घेताना मुळात ते कमी दाखविण्याची शक्कल लढविली आहे. कमी खोदकाम दाखवून जास्त प्रमाणात खोदून शुल्क कमी भरण्याचा फंडा अवलंबविण्यात आला आहे. संपूर्ण शहरातील गल्ली बोळात केबल टाकण्यासाठी भुयारी खोदकाम युद्धस्तरावर सुरु आहे. हे खोदकाम करताना डांबरीकरणाचे रस्ते, सिमेंट कॉक्रिटीकरण फोडले जात आहे. काही महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चूंन तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवरही खोदकाम होत असल्याची बाब सदस्यांनी जाहीरपणे सभागृहात बोलून दाखविली. ११६ कि.मी. लांबीचे खोदकाम होत असेल याचे ठोस पुरावे काय, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला आहे. नुकतेच रुजू झालेल्या आयुक्तांच्या पुढ्यात हा गंभीर प्रकार आल्याने खोदकाम न झालेल्या भागातही निधी वाटप करण्यात आल्याने खरेच शहरात किती किलो मिटर लांबीचे भुयारी खोदकाम झाले, या खोलात शिरण्याचा प्रयत्न आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी चालविला आहे. खोदकाम परवानगीचा विषय बांधकाम विभागाशी आहे. या विभागावर आयुक्तांची करडी नजर आहे. परवानगीशिवाय अतिरिक्त खोदकाम झाले असेल तर अभियंत्यांची खैर नाही. (प्रतिनिधी)

खोदकामाची चौकशी झालीच पाहिजे - चेतन पवार
शहरात केबल टाकण्यासाठी दिलेल्या खोदकामापेक्षा जास्त खोदून रिलायन्स कंपनी दिशाभूल करीत असेल तर झालेल्या खोदकामाची चौकशी करुन संबंिधतांवर कारवाई व्हावी. जेवढे जास्त खोदकाम केले असेल तेवढ्या खोदकामाची रक्कम दंडात्मक कारवाईसह वसूल व्हावी, असे पत्र आयुक्तांना देणार, असे माजी सभापती चेतन पवार म्हणाले.

जास्त खोदकाम ही गंभीर बाब - प्रदीप दंदे
रिलायन्स कंपनीने केबल खोदकाम परवानगीपेक्षा जास्त केले असेल तर ही गंभीर बाब आहे. यात जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. परवानगीपेक्षा जास्त खोदकाम केल्याचे सिद्ध झाले तर कंपनीवर फौजदारी कारवाई व्हावी, असे रिपाइंचे नगरसेवक प्रदीप दंदे ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

Web Title: Reliance excavation more than sanction?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.