कोरोनाकाळात शेतकरी आत्महत्यांमध्ये दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:09 AM2021-06-06T04:09:34+5:302021-06-06T04:09:34+5:30
गजानन मोहोड अमरावती : राज्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हा अशी बोचरी असणारी अमरावती जिल्ह्याची ओळख यंदा काहीअंशी कमी झालेली ...
गजानन मोहोड
अमरावती : राज्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हा अशी बोचरी असणारी अमरावती जिल्ह्याची ओळख यंदा काहीअंशी कमी झालेली आहे. गतवर्षी मेअखेरपर्यत १०८ शेतकरी आत्महत्या झालेल्या होत्या. त्यातुलनेत यंदा ७८ प्रकरणे घडली आहेत. कोरोनाकाळात शेतकरी आत्महत्या घटल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे.
अस्मानी अन् सुलतानी संकटांमुळे सन २०२० मध्ये २९५ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास गळ्याला बांधला. सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, यातून वाढलेले बँकांसह खासगी सावकारांचे कर्ज व कर्जवसुलीचा तगादा, याशिवाय मुलामुलींचे शिक्षण, लग्न या विवंचनेत शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य भारी पडत आहे. जगावं कसं, या मानसिकतेतून धीर खचून शेतकरी आत्महत्या करीत असल्याची शोकांतीका आहे.
शासनाने शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यांसाठी अनेक योजना दिल्या. मात्र, खऱ्या व गरजू शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचतच नाही. त्यामुळे उत्पादन खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ कधीच जुळत नाही. डोईवरचा कर्जाचा भार दरवर्षी वाढताच असतो. शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी असणाऱ्या जिल्हा समितीची बैठक चार-चार महिने होत नाही. केवळ शासनच नव्हे तर प्रशासनदेखील या संवेदनशील विषयावर गंभीर नाही. त्यामुळे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात होत आहेत. शासनाने कर्जमाफी केली असली तरी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे.
पाईंटर
शेतकरी आत्महत्यांची स्थिती
महिना २०२० २०२१
जानेवारी २४ २०
फेब्रुवारी २७ ११
मार्च १४ २०
एप्रिल १३ १४
मे २९ ०८
बॉक्स
४८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित
जिल्ह्यात यंदा शेतकरी आत्महत्यांची ७३ प्रकरणे घडली. यामध्ये चार प्रकरणे नामंजूर करण्यात आली. २१ प्रकरणे पात्र ठरवून मृतांच्या वारसाला एक लाखाची शासकीय मदत देण्यात आली. याशिवाय ४८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या मृत्यूपश्चात लालफीतशाहीचा ससेमिरा त्यांच्या वारसाच्या मागे लागला आहे.
बॉक्स
२० वर्षांत ४,२९६ शेतकऱ्यांनी घेतला मृत्यूचा घोट
जिल्ह्यात सन २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद घेतली जात आहे. त्यानुसार जिल्ह्यात ४,२९६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये शासन मदतीसाठी १,९५९ प्रकरणे पात्र ठरली आहेत. त्यापेक्षा जास्त २,२६५ प्रकरणे अपात्र ठरविली गेली. याशिवाय ७२३ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे अद्याप चौकशीसाठी प्रलंबित आहेत.
कोट
०००