शेतकऱ्यांना दिलासा... पीक विम्याला ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: July 31, 2023 02:07 PM2023-07-31T14:07:15+5:302023-07-31T14:08:43+5:30
३१ जुलै होती डेडलाइन, सर्व्हरच्या त्रासामुळे एक लाखावर शेतकरी होते प्रतीक्षेत
अमरावती : यंदापासून एक रुपयात पीक विम्यात शेतकऱ्यांना सहभाग नोंदविता येत आहे. यासाठी ३१ जुलै ही डेडलाइन असताना योजनेच्या पोर्टलची गती मंद आहे. यामुळे एक लाखावर शेतकरी वंचित राहण्याची शक्यता असतांनाच ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.
योजनेत सहभागासाठी सातत्याने तांत्रिक अडचणींचा अडसर येत आहे. यामध्ये आधार क्रमांक व्हेरिफाय होत नाही, तर कधी सात-बाराचे संकेतस्थळ बंद असते. यामधून सुटले, तर पीक विमा योजनेचे पोर्टल स्लो असल्याने शेतकरी त्रासून गेले आहेत.
एक रुपयात पीक विमा परतावा मिळणे शक्य असल्याने शेतकऱ्यांनी सामूहिक सेवा केंद्रात (सीएससी) गर्दी केलेली आहे. उशिराच्या पावसाने शेतकरी पेरणीत व्यस्त होते. नंतर अतिवृष्टी व सततच्या पावसाने पिकांचे नुकसान होऊन यातून शेतकरी सावरून पीक विम्यात सहभाग घेण्यासाठी केंद्रात जात असताना सर्व्हर डाऊनचा खोडा चिंता वाढवित असतांना मुदतवाढीने दिलासा मिळाला आहे.
कर्जदार शेतकऱ्यांसाठी बँकांचाही खोडा
जिल्ह्यातील किमान दीड लाख कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विम्यात सहभाग नोंदविला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांद्वारे खरिपासाठी कर्ज घेत असताना काही बँका अर्जासोबतच पीक विम्याशी संबंधित ‘ऑप्ट आऊट फार्म’वर सह्या घेत आहेत. त्यामुळे कर्जदार शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
पीक विमा योजनेची जिल्हा स्थिती
योजनेत सहभागी शेतकरी : ४५६२८२
यामध्ये कर्जदार शेतकरी : ३१७६
गैरकर्जदार शेतकरी सहभाग : ४५३१०६
विमा संरक्षित केलेले क्षेत्र :४,०७,७८५ हेक्टर
शेतकऱ्यांचा प्रीमियम : ४५६२८० रुपये
राज्य शासनाचा प्रीमियम : २००.८७ कोटी
केंद्र शासनाचा प्रमियम : १४१.५५ कोटी