आर्किटेक्चर अभासक्रमाच्या विद्यार्थाना दिलासा; प्रवेशाच्या जाचक अटी शिथील
By गणेश वासनिक | Published: July 25, 2023 06:12 PM2023-07-25T18:12:38+5:302023-07-25T18:13:22+5:30
वास्तुकला अभ्यासक्रमाला प्रवेशाकरिता असणारे अटींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.
अमरावती : वास्तुकला अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुकर व्हावी आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा, यासाठी शासनाच्या वास्तुकला परिषदेने प्रथम वर्ष प्रवेशातील जाचक अटी शिथिल केल्या आहेत. सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षापासून ही नियमावली लागू केली जाणार आहे. त्यानुसार वास्तुकला परिषदेने १९ जुलै रोजी राजपत्र प्रसिद्ध केले आहे. शासनाकडून वास्तुकला परिषदेच्या राज्यपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या सुधारित अधिसूचनेनुसार वास्तुकला अभ्यासक्रमाला प्रवेशाकरिता असणारे अटींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.
त्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याकरिता इच्छुक असून सुद्धा अटी पूर्ण करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ही सुवर्णसंधी ठरतील आणि प्रथम वर्ष वास्तुकला अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता पात्र ठरणार आहे. विद्यार्थ्याचे हित लक्षात घेता गत काही महिन्यापासून राज्यातील आर्किटेक्चर महाविद्यालयाकडून दिल्ली येथील कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांना अटी शिथिल करण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत वास्तुकला परिषदेचे अध्यक्ष डॉ. अभय पुरोहित यांच्या पुढाकाराने प्रवेशातील जाचक अटी वगळण्यात आल्याची माहिती डॉ सचिन हजारे यांनी दिली.