शेतकऱ्यांना दुष्टचक्रातून दिलासा

By admin | Published: February 12, 2017 12:12 AM2017-02-12T00:12:49+5:302017-02-12T00:12:49+5:30

मागील वर्षी राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या होत्या.

Remedies for farmers from bad luck | शेतकऱ्यांना दुष्टचक्रातून दिलासा

शेतकऱ्यांना दुष्टचक्रातून दिलासा

Next

यंदा १७ प्रकरणे : २०१६ च्या जानेवारीत ३९ आत्महत्या
अमरावती : मागील वर्षी राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या होत्या. तसेच जानेवारी महिन्यात ३९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. यंदा मात्र या दुर्दैवी दुष्टचक्रातून जिल्ह्याला थोडा दिलासा मिळाला. यंदाच्या जानेवारीत शेतकरी आत्महत्येचे १७ प्रकरणे घडली. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊच नये, यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना जिल्ह्यात राबविण्याची गरज आहे.
अमरावती विभागासह नागपूर विभागातील वर्धा अश्या सहा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत असल्याने १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद ठेवण्यात येत आहे. त्यानुसार ३१ जानेवारी २०१७ अखेर जिल्ह्यात ३०७१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये १२२१ प्रकरणे मदतीसाठी पात्र, १८१९ अपात्र व ३१ प्रकरणे चौकसीसाठी प्रलंबित आहेत. सततचा दुष्काळ, नापिकी व कर्जबाजारीपणा यामुळे नैराश्य येऊन जिल्ह्यातील शेतकरी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबावे यासाठी शासनाने राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांसाठी विविध योजना शासनाने राबविल्या. प्रत्यक्षात खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे शासनाने वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची पुनर्रचना केली. मात्र मिशन देखील शेतकरी आत्महत्या रोखण्यास अपयशी ठरल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली. मागील वर्षी ३४८ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. दर ३० तासात एका शेतकऱ्याची आत्महत्या असे जिल्ह्याचे दुर्दैवी चित्र होते. किंबहुना गतवर्षी राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या होत्या. सलगचा दुष्काळ व नापिकी हे आत्महत्यांमागे प्रमुख घटक होते. मात्र यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाने खरिपाला साथ दिली. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांच्या दृष्टचक्रात जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.

राज्यात सर्वाधिक आत्महत्या अमरावती जिल्ह्यात
गतवर्षी जिल्ह्यात ३४८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद व्हायची. ती ओळख पुसली गेली व सन २०१६ मध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या, अशी नोंद झाली आहे. यंदा मात्र जानेवारी महिन्यात शेतकरी आत्महत्यांची कमी झाल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला.

Web Title: Remedies for farmers from bad luck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.