खुनाचा कट उधळला; दोन पीस्तूल, पाच काडतुसे, १४ तलवारी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 01:18 AM2019-06-23T01:18:10+5:302019-06-23T01:21:43+5:30
रेती व्यवसायातील वैमनस्यातून आखलेला खुनाचा कट पोलिसांनी उधळून लावला. गाडगेनगर व नागपुरी गेट पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई शुक्रवारी मध्यरात्री लालखडी रोडवरील एमपी ट्रान्सपोर्टनगर येथे केली. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, ११ आरोपी पसार झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रेती व्यवसायातील वैमनस्यातून आखलेला खुनाचा कट पोलिसांनी उधळून लावला. गाडगेनगर व नागपुरी गेट पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई शुक्रवारी मध्यरात्री लालखडी रोडवरील एमपी ट्रान्सपोर्टनगर येथे केली. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, ११ आरोपी पसार झाले आहेत. गाडगेनगर पोलिसांनी अटकेतील आरोपींकडून दोन देशी पीस्तुलांसह पाच जिवंत काडतुसे १४ तलवारी, चार मोबाईल, एक चारचाकी वाहन व नऊ मोटरसायकली जप्त केल्या आहेत. अमरावती शहरात मोठे गँगवॉर टळल्याचा दावा पोलिसांनी केला.
गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात या प्रकरणात १५ आरोपींविरुद्ध कलम ३/२५, ४/२५ आर्म्सअॅक्ट, भादंविचे कलम १०९ व १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी मोहम्मद सादिक शेख रज्जाक (३५, रा. हबिबनगर नं. २), नैयर अली बेग मुक्कदर अली बेग (३५, रा. गवळीपुरा), वसीम खान माले खान (३२, रा. जहीदनगर), अबिद खान सुभान खान (२५, रा. लालखडी) यांना अटक केली. २१ जून रोजीच्या रात्री ११ वाजता मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गाडगेनगर व नागपुरी गेट पोलिसांच्या पथकांनी एमपी राजस्थान ट्रान्सपोर्ट हाऊससमोर सापळा रचला. तेथील एमएच २० बीवाय ९६९८ क्रमांकाच्या चारचाकी वाहनांजवळ पोलीस गेले असता, त्यात बसलेले दहा ते बारा जण पळून गेले, तर चार जण पोलिसांच्या हाती लागले.
पोलिसांना त्या वाहनात १४ तलवारी मिळून आल्या. सोबत आरोपींची अंगझडती दोन देशी पीस्तुलांसह पाच जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी आरोपींजवळून चार मोबाइल जप्त केले. चारचाकी वाहनासह घटनास्थळाहून पसार आरोपींच्या नऊ मोटरसायकली जप्त केल्या आहेत. पोलिसांनी एकुण १५ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा शस्त्रसाठा कुणाचा गेम करण्यासाठी होता, याची शहरात चर्चा आहे.
सीपींकडून पोलिसांना रिवार्ड
पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात गाडगेनगर ठाणेदार मनीष ठाकरे, नागपुरी गेटचे ठाणेदार अर्जुन ठोसरे, गाडगेनगरचे उपनिरीक्षक गोकुल ठाकुर, डीबीचे शेखर गेडाम, विशाल वाकंपांजर, सतीश देशमुख, भारत वानखडे, अनिल तायवाडे, उमेश उईके, प्रशांत वानखडे व नागपुरी गेटचे पीएसआय पुरुषोत्तम ठाकरे, शिपाई प्रमोद गुडदे, विनोद इंगळे, अकील खान, चालक पवार, बारबुद्धे, चार्ली इप्पर, कोहली यांनी कारवाई केली. पोलीस आयुक्तांनी गाडगेनगर ठाण्यात भेट देऊन ठाणेदार ठाकरे यांना तीन हजार व उर्वरित प्रत्येकाला दोन हजारांचा रिवार्ड दिला.
रेती तस्करीतून हत्येचा कट
शहरातील रेती तस्करांमधील व्यावसायिक स्पर्धेतून काही गुंड प्रवृत्तीच्या इसमांनी एका व्यावसायिकाच्या हत्येचा कट रचला होता. हत्येसाठी पूर्वतयारी म्हणून हा मोठा शस्त्रसाठा गोळा केला होता. यादरम्यान पोलिसांनी हत्येचा कट उधळून लावला, अन्यथा मोठी घटना घडली असती.
पसार आरोपींमध्ये राजकीय पदाधिकारी
पोलिसांनी चार आरोपींना अटक करून त्यांची चौकशी केली असता, त्याने त्यांच्या अन्य साथीदारांची नावे सांगितली. त्यामध्ये एका राजकीय पदाधिकाऱ्याचे नाव पुढे आले आहे. महापालिकेचा तो नगरसेवक असून, कोणाचा तरी गेम करण्यासाठी हा शस्त्रसाठा दिल्याचे आरोपींनी सांगितले. पोलिसांनी जप्त केलेल्या एमएच २० बीवाय ९६९८ क्रमांकाच्या वाहनाच्या समोरील काचावर ‘हिवाळी अधिवेशन २०१७’ हे स्टिकर होते.