अधिकारी, कर्मचाऱ्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 11:34 PM2019-05-06T23:34:14+5:302019-05-06T23:34:40+5:30
पावसाचे वाहून जाणारे पाणी भूगर्भात जिरावे व याद्वारे भूजलात वाढ व्हावी, यासाठी महापालिकाद्वारे जलजागृती करण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात आयुक्त संजय निपाणे यांच्या निवासस्थानी सोमवारी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली लावून करण्यात आली. महापालिकेचे सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्याची सक्ती करण्यात आलेली आहे. महानगरात ही मोहीम व्यापक करण्याचा मानस आयुक्त संजय निपाणे यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पावसाचे वाहून जाणारे पाणी भूगर्भात जिरावे व याद्वारे भूजलात वाढ व्हावी, यासाठी महापालिकाद्वारे जलजागृती करण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात आयुक्त संजय निपाणे यांच्या निवासस्थानी सोमवारी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली लावून करण्यात आली. महापालिकेचे सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्याची सक्ती करण्यात आलेली आहे. महानगरात ही मोहीम व्यापक करण्याचा मानस आयुक्त संजय निपाणे यांनी व्यक्त केला.
लोकसंख्यावाढ झाल्याने शहराची पाण्याची मागणीदेखील वाढली आहे. ही गरज भागवायला ठिकठिकाणी बोअरवेल खोदले जात असल्याने भूगर्भाची चाळण होत आहे आणि भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. त्यामुळे प्रत्येक घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग हाच एकमेव पर्याय असल्याने नागरिकांत याविषयी जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. आयुक्त संजय निपाणे यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त नरेंद्र वानखडे व महापालिका अधिकाºयांनी यासाठी कंबर कसली आहे. या अभियानाची सुरुवात आयुक्तांच्या निवासस्थानी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प लावून करण्यात आली. आता महापालिकेचे सर्व अधिकारी, अभियंते व कर्मचारी यांना त्यांच्या निवासस्थानी रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त संजय निपाणे यांनी दिली. महापालिकेच्या पुढाकारातून याविषयी कार्यशाळादेखील रविवारी घेण्यात आली. पावसाळा सुरू झाला की, रस्त्यांमध्ये पाणी तुंबते. नाले तुडुंब वाहू लागतात. त्यामुळे वाहतूक ठप्प होते. रस्त्यांनी वाहणारे हे पाणी जर रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमाने साठविले गेले, तर पाण्याचे दुर्भीक्ष नक्कीच कमी होईल.
पाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर कमी विसंबून राहावे लागेल व पाण्याची पातळी वाढेल. त्यामुळे पाणी वर खेचण्यासाठी लागणाºया विजेच्या वापरात बचत होईल तसेच जमिनीची धूप रोखण्यास काही प्रमाणात मदत होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
काय आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग
पावसाचे पाणी घराच्या छतावरून जमिनीखालच्या टाकीमध्ये गोळा करतात. काही ठिकाणी पाणी खोल खड्डा (विहीर, शाफ्ट किंवा बोअरहोल), तसेच पाझर असलेल्या जलाशयांत साठवतात. पाणी जाळी किंवा इतर साधनांसह दव किंवा धुक्यातूनही गोळा केले जाते. रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे जमिनीमध्ये जिरविलेले पाणी शेतीच्या कामी वापरले जाऊ शकते. विशेषत: कमी पाऊस झाल्यास किंवा पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी या साठविलेल्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो. जनावरांना पाजण्यासाठीही हे पाणी वापरले जाऊ शकते.
आधी स्वत:च्या निवासस्थानी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प लावला. त्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचाºयांना सक्ती केली. आता एमआयडीसी व क्रेडाई यांना पत्र देऊन अनिवार्य केले आहे. भविष्यात याला व्यापक स्वरूप देणार आहोत.
- संजय निपाणे, आयुक्त, महापालिका