प्रियदर्शनी व्यापार संकुलास रेडीरेकनरनुसार भाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:40 AM2020-12-17T04:40:23+5:302020-12-17T04:40:23+5:30
अमरावती १६ : व्यापार संकुलांना वार्षिक बाजार मूल्य तक्त्यानुसार भाडे दर आकारण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिल्याने महापालिकेच्या ...
अमरावती १६ : व्यापार संकुलांना वार्षिक बाजार मूल्य तक्त्यानुसार भाडे दर आकारण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिल्याने महापालिकेच्या प्रियदर्शनी व्यापारसंकुलाचे भाडे निश्चिती होण्याची शक्यात आहे. मात्र, यासंदर्भात सर्वसाधारण सभेत मंजुरी देणे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले.
महापालिकेच्या प्रियदर्शनी व्यापार संकुल विकासकाला बीओटी तत्त्वावर २५ वर्षांच्या लीजवर देण्यात आले होते. त्याची मुदत संपल्याने हे संकुल वर्ग होणे अपेक्षित आहे. मात्र, भाडेदरावरून विकासक, गाळेधारक व मनपा प्रशासन यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. न्यायालयीन प्रक्रियेसह नगरविकास विभागाकडेही सुनावणी झाली. मात्र, भाडेदराचा प्रश्न आतापर्यंत प्रलंबित असल्याने गाळेधारकांना एक रुपया प्रतिचौरस फूट भाडे व मालमत्ता कर मिळून हे दर एक रुपया ६४ पैसे आकारणी होत आहे.
महापालिका प्रशासनाद्वारा भाडेदर वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला. दरम्यान संकुलातील बरेच गाळे मूळ मालकांनी हजारो रुपयांत भाड्याने दिले आहेत. काही गाळे मनपाच्या पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतरित करण्यात आले. काहींनी परवानगी न घेता नूतनीकरण केले आहे.
शासनाच्या नगरविकास विभागाने रखडलेला हा प्रश्न मार्गी लावला आहे.
आयुक्त प्रशांत रोडे यांनी त्यासाठी बरेच प्रयत्न केलेत. व्यापार संकुलातील गाळ्यांना आता मालमत्ता मूल्यांकनाच्या (रेडीरेकनर) दरावर आधारित भाडे आकारण्याची सूचना करण्यात आली आहे. मालमत्ता दराच्या आठ टक्के अथवा त्या परिसरातील बाजारभाव यावर आधारित भाडे आकारण्यात येणार आहे. शासनाच्या या आदेशाने संकुलातील व्यापारी वर्ग अस्वस्थ झाला आहे. त्यांनी पुन्हा दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला आहे.
कोट
शासनादेशानुसार भाडेदर आकारण्यात येईल. संकुलात काही बदल झाले आहेत. हस्तांतरण व नूतनीकरणाचा मुद्दा आहे. तो सोडविण्यात येईल. आदेशानुसार कार्यवाही केली जाईल.
- प्रशांत रोडे,
आयुक्त, महापालिका